no images were found
नागरिकांनी आर्थिक नियोजन करावे -संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर : नागरिकांनी आपली गरज ओळखून आर्थिक नियोजन करावे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई क्षेत्रीय कार्यालयाद्वारे कोल्हापूर येथे आर्थिक साक्षरतेबाबत “अखिल भारतीय प्रश्नमंजूषा स्पर्धा” कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आर्थिक समावेशनाचे ध्येय साध्य करण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेबाबत “अखिल भारतीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन रिझर्व बँक ऑफ इंडियातर्फे अग्रणी बँकेच्या समन्वयाने करण्यात आले. जिल्हा स्तरावरील स्पर्धा स्व.वसंतराव नाईक समिती सभागृह, जिल्हा परिषद येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेअंतर्गत तालुका स्तरावरील स्पर्धा दि.23 जून 2023 रोजी घेण्यात आल्या, यातून 10 शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आल्या. जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी प्रथम क्रमांक तर राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर व एम. आर. हायस्कूल गडहिंग्लज यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या 3 शाळांना अनुक्रमे 10 हजार रुपये, 7 हजार 500 रुपये व 5 हजार रुपये रक्कम व परितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजीचे विद्यार्थी राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
ऑनलाइन फसवणूक यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहून आपल्या कुटुंबासहित सर्व लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह यांनी कार्यक्रमा दरम्यान केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे वित्तीय समावेशन विभागाचे व्यवस्थापक विश्वजित करंजकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे व 10 शाळातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्व सांगून मनोगत व्यक्त केले.