no images were found
मला पाठीत खंजीर खूपसायची सवय नाही; समरजितसिंह घाटगे
कोल्हापूर : मला पाठीत खंजीर खूपसायची सवय नाही, आमच्या ते रक्तात नाही, रात्री झोपतानाही त्यांना समरजितसिंह घाटगे दिसतो. कागलचा बदल दिसू लागला आहे, त्यामुळे ते आरोप करत आहेत, अशा शब्दात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपानंतर प्रत्युत्तर दिले. माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल, कोल्हापूर आणि पुणे येथील ईडीने छापेमारी केली आहे. छापेमारीची कारवाई सुरु असताना मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर थेट तोफ डागली होती. यानंतर आज समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की, निर्दोष असाल, तर जातीच्या मागे का जाता? जातीच्या मागे लपून राजकारण करणारा जातीवादी असतो. नवाब मलिकांच्या कॅटेगरीत ते स्वत: गेले. नवाब मलिकांवर टेरर लिंकचे आरोप आहेत. ते पुढे म्हणाले की, कोर्टाच्या आदेशाने ते आरोपी असताना मलिकांना क्लीनचिट देण्यात एवढं प्रेम का? किरीट सोमय्यांनी अनेक नेत्यांची यादी जाहीर केली, पण नवाब मलिकांना मुश्रीफांनी क्लिनचिट दिली. मलिक आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत का? हे आता पाहण्याची वेळ आली आहे. तुम्ही चौकशीला सामोरे जा, माझा काही संबंध नाही, मला किरीट सोमय्यांच्या मागे लपायची गरज नाही.
ईडी कारवाई होताना हसन मुश्रीफ मुंबईत होते. मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख न करता भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कागलमधील त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. कागलमधील भाजप नेत्याने गेल्या चार दिवसांपासून ईडीने कारवाई करण्यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या होत्या, असे मुश्रीफ म्हणाले होते. चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीला फेऱ्या मारून माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना चारच दिवसात ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगतले होते हे मी जबाबदारीने सांगतो. अशा प्रकारे नाउमेद करून गलिच्छ राजकारण सुरु आहे. राजकारणात अशा कारवाई होणार असतील, तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.