
no images were found
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी संक्रांतीत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर सकारात्मक पाऊल उचलत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा शुक्रवारीच पगार होणार असल्याचे राज्य सरकारने एक परिपत्रक काढलेले आहे. यामध्ये असे नमूद आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2022 च्या वेतनासाठी 2022-23 मध्ये गृह विभागाच्या २०४१ ००१८ – ३३, अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून ३०० कोटी रुपये प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर ३०० कोटी रुपये हा खर्च २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा. किमान वेतन हे वेळेत मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयात दाद मागितली होती. या संदर्भात न्यायालयाने निकाल देताना म्हटले, प्रत्येक महिन्याच्या देय तारखेला पगार दिला पाहिजे. तर प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने सरकारकडून सांगण्यात आले होते.
या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय गुरुवारी उशिरा जाहीर केला. परंतु, हा निधी अपुरा असून त्यामधून केवळ वेतन होणार असून निवृत्ती वेतन, ग्रॅच्युएटी व बँक कर्ज ही देणी प्रलंबित राहतील. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून केला जात आहे.