
no images were found
गॅस हिटर रात्रभर सुरु ठेवल्याने कुटुंबातील चौघाचा गुदमरून अंत
गुरुग्राम : खोलीतील गॅस हिटर रात्रभर सुरु ठेवल्याने कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाला. श्वास गुदमरल्यामुळे चौघा सदस्यांना प्राण गमवावे लागले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी रविवारी वर्तवला. हरियाणातील झज्जर शहरात ही घटना घडली आहे.
रविवारी सकाळी दूधवाला संबंधित कुटुंबाच्या दाराबाहेर ताटकळत उभा राहिला होता. वारंवार बेल वाजवूनही कोणीही दार न उघडल्यामुळे त्याला संशय आला आणि हा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ३५ वर्षीय आसिफ स्थानिक मदरशात लिपीक पदावर कार्यरत होता. शनिवारी रात्री आसिफ, त्याची ३२ वर्षीय पत्नी शगुफ्ता, तीन वर्षांचा मुलगा झैद आणि दोन वर्षांची मुलगी मायरा झोपायला गेले. प्रचंड थंडी असल्यामुळे रात्रभर त्यांनी आपल्या खोलीतील गॅस हिटर सुरु ठेवला होता. गॅस हिटरमुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि रविवारी सकाळपर्यंत चौघांचाही मृत्यू झाल्याचे मंडळ अधिकारी बिस्व अभिषेक प्रताप यांनी सांगितले.
दूधवाल्याला आतून कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्याने शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यामुळे शंका उपस्थित झाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. त्यावेळी कुटुंबातील चारही जण बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेले आढळले. चौघांना बिस्व समाजाच्या हेल्थ सेंटरमध्ये तातडीने नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी चौघाही जणांना मृत घोषित केले. गेल्या आठवडाभरात उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. तापमान प्रचंड खाली घसरले आहे. पुढील ४८ तासांपर्यंत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. हिवाळ्यातील दाट धुक्यामुळे रेल्वे, विमानं विलंबाने असून शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.