
no images were found
इंडिगोच्या विमानात तिघांकडून एअर होस्टेसचा विनयभंग, कॅप्टनलाही मारहाण
पाटणा : दिल्लीहून पाटणामध्ये येत असलेल्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये नशेत असलेल्या ३ तरुणांनी एअर होस्टेससोबत गैरवर्तन केलं. तीन आरोपी प्रवाशांची एअरहोस्टेससोबत बाचाबाची झाली. एअर होस्टेससोबत झालेल्या भांडणाची माहिती विमानाच्या कॅप्टनला मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पाटणा विमानतळावर विमान उतरवल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने सीआयएसएफला देण्यात आली. पाटणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून २ जणांना ताब्यात घेतलं. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
विमानतळाबाहेर पडल्यानंतर यातील एक तरुण पळून गेल्याचंही सांगितलं जात आहे. त्याचीही ओळख पटवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिला प्रवाशावर लघवी केली. हे प्रकरण २६ नोव्हेंबर २०२२ चं आहे. महिला प्रवाशाच्या तक्रारीनंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वेल्स फार्गो या अमेरिकन वित्तीय सेवा कंपनीत उपाध्यक्ष असलेल्या शंकर मिश्रा याने एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिला सहप्रवाशावर लघवी केली. या घटनेनंतर कंपनीने आरोपी शंकर मिश्रा याला नोकरीवरून काढून टाकलं. एअरसेवा पोर्टल आणि दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटलं आहे की, जेव्हा तिने केबिन क्रूला याबद्दल सांगितलं तेव्हा तिला मिश्रा याच्याशी बोलणी करण्यास भाग पाडलं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ५ जानेवारीला सांगितले होते की, ४ जानेवारीला या घटनेची माहिती मिळाली.