
no images were found
ताकदीला कल्पकतेची जोड देणारा अभिजीत कटके झाला हिंद केसरी
पुणे : पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा मल्ल अभिजीत कटके याने रविवारी हैदराबाद येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिष्ठेचा ‘हिंद केसरी’ किताब मिळवला. भारतीय पारंपरिक शैली कुस्ती संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. अंतिम फेरीच्या लढतीत अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरचा ४-० असा पराभव करून मानाची गदा उंचावली. अभिजीत हा पुण्यातील शिवरामदादा तालमीत सराव करतो.
भूगाव येथे २०१७ मध्ये झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात अभिजीतने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावली होती. त्यानंतर आता अभिजीत हिंद केसरीचाही मानकरी ठरल्याने राज्यभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र एकामागोमाग एक स्पर्धा जिंकणाऱ्या अभिजीत कटकेसह त्याच्या कुटुंबियांनी लाल मातीतील या खेळासाठी मोठा त्यागही केला आहे. अभिजीत कटके याने हिंद केसरीचा किताब पटकावल्यानंतर त्याच्या आईला भावना अनावर झाल्या. ‘कुस्तीच्या सरावामुळे मागील १७ वर्षांपासून अभिजीत माझ्यापासून दूर आहे. आमचं फक्त हिंद केसरीचंच स्वप्न बाकी होतं आणि अभिजीतने आता तेही पूर्ण केलं आहे. त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे की तो शब्दांत व्यक्त करता येत नाही. वाघोलीत आल्यानंतर आम्ही त्याचं भव्य स्वागत करू,’ असं म्हणत अभिजीत याच्या आईने मुलाच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
अभिजीत हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान. पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा हा मुलगा. अभिजीतच्या रूपाने त्यांच्या घरातील पाचवी पिढी कुस्तीत आहे. अमर निंबाळकर, भरत म्हस्के, हणमंत गायकवाड, गुलाब पटेल यांचे त्याला मार्गदर्शन लाभते. अभिजितने २०१५मध्ये ‘युवा महाराष्ट्र केसरी’चा मान मिळवला. त्यानंतर २०१६मध्ये त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. ताकदीला कल्पकतेची जोड देत कुस्त्या जिंकण्याचा अभिजीतचा ‘डाव’ काही काळापासून कमालीचा यशस्वी ठरत आहे. युवा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले व अमोल बुचडे यांच्या रांगेत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने मिळवला आहे. भारतीय पारंपरिक शैली कुस्ती संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेतील अभिजीत पुण्याचा दुसरा हिंद केसरी ठरला. यापूर्वी हा मान योगेश दोडकेने मिळवला होता. त्याचबरोबर एक वर्ष मॅटवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पुण्याच्याच अमोल बराटेने हिंद केसरीचा मान मिळवला होता.