no images were found
जोशीमठात भूस्खलनाचा धोका वाढला उत्तराखंड
देहरादून : घरांचे तडे आणि भिंत खचण्याच्या घटनांमुळं त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचे भय वाढले आहे. जोशीमठावरील संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घरांना तडे गेल्यानंतर आता मंदिरे आणि मठांनाही याचा फटका बसला आहे. आदि गुरु ज्योतिषाचार्यांचा मठाच्या परिसरातही काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मठाच्या परिसरात असलेल्या शिव मंदिर पाच इंच खचले आहे. तर, मंदिरात असलेले शिवलिंगाचेही नुकसान झाले आहे.
जोशीमठमध्ये आदि शंकराचार्य यांनी माधवाश्रमाची स्थापना केली होती. या मठात वैदिक शिक्षा घेण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी येतात. सध्या या मठात साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदि गुरु शंकराचार्य यांच्या मठात एक शिवमंदिर आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरात २००० साली जयपूरहून आणलेल्या स्फटिकाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. मठाच्या परिसरात गेल्या एक वर्षांपासून भेगा पडत आहेत. तेव्हा सामान्य घटना समजून आम्ही दुर्लक्ष केलं व भेगांमध्ये सिमेंट भरले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. आता मोठ्याप्रमाणात जमिनीला भेगा पडत आहेत, असं मठातील एका व्यक्तीने सांगितले.
काही दिवसांपूर्वी शिवलिंगामध्ये चंद्रकोराच्या आकाराची एक भेग दिसून आली होती. मात्र आता ही भेग वाढतच जात आहे. तर, मंदिरातील टाइल्सचदेखील नुकसान झाले आहे. दरम्यान, खंडित झालेले शिवलिंग हटवण्यास पुजारी वशिष्ठ ब्रह्मचारी यांनी नकार दिला आहे. ही देवभूमी असून येथे भगवान शंकराचा वास आहे. मग हे शिवलिंग कसं खंडित होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. जोशीमठ हिंदू धर्मियांचे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. जोशीमठला ज्योतिर्मठदेखील बोलतात. दरम्यान, शहर वाचविण्यासाठी समस्येचा अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जोशीमठमध्ये तळ ठोकून आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली. या प्रकारानंतर चार धाम रस्ता आणि एनटीपीसीच्या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले आहे.