
no images were found
संजय राऊत यांच्याविरोधातील वॉरंट रद्द; पुढील सुनावणी २४ जानेवारीला
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते; परंतु राऊत यांनी न्यायालयात उपस्थिती लावल्याने न्यायालयाकडून वॉरंट रद्दबातल करण्यात आले.
दरम्यान, दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत वारंवार गैरहजर राहिले आहेत, असा ठपका ठेवून न्यायालयाने त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी न्यायालयाने मेधा यांचा जबाब नोंदवला आणि पुढील सुनावणी २४ जानेवारीला निश्चित केली. परंतु काही वेळातच राऊत न्यायालयात हजर झाल्याने दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी वॉरंट रद्दबातल केले. न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या छाननीनंतर सोमय्या यांच्या आरोपात तथ्य दिसते, असे मत यापूर्वी न्यायालयाने व्यक्त केले आहे. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले होते. त्याचप्रमाणे समाजमाध्यमावरदेखील याबाबत माहिती दिली होती; मात्र या घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा मेधा सोमय्या यांनी केला.