
no images were found
स्टेट बँक मॅनेजरच्या रहस्यमय खुनाचा छडा
बुलढाणा : मुंबईकर असलेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरचा मृतदेह बुलढाण्यातील उसाच्या शेतात सापडल्याने खळबळ उडाली होती. ३६ वर्षीय उत्कर्ष पाटील यांच्या मृतदेहाशेजारी धारदार चाकूही सापडला होता. पाटील ज्या लॉजवर थांबत होते, त्याच्या मॅनेजरनेच खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. उत्कर्ष पाटलांकडे खूप पैसे असावेत, या समजातून आरोपीने त्यांचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार रस्त्यावरील सारंगपूर फाट्याजवळ असलेल्या उसाच्या शेतात उत्कर्ष पाटील यांचा मृतदेह एक जानेवारीच्या संध्याकाळी आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. उत्कर्ष पाटील हे गेल्या काही दिवसांपासून हिरडा येथील स्टेट बँक मॅनेजर म्हणून काम पाहत होते.
घटनास्थळी धारदार चाकूही मिळून आला होता. या खुनाचा छडा लावण्यात एलसीबी टीमला यश मिळाले असून चिखली कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. एसीबीचा कारभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे.
चार महिन्यांपूर्वी बदली होऊन उत्कर्ष पाटील बुलढाणा जिल्ह्यात आले होते. त्यांचा परिवार मुंबईत असल्याने ते लॉजवर थांबायचे. स्वभाव अतिशय शांत आणि कमी बोलणारे उत्कर्ष पाटील यांची परिसरात ओळख कमी होती. त्यामुळे त्यांचा खून कोणत्या कारणासाठी केला जाईल, असा सवाल पडला होता. उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील एका लॉजवर थांबायचे. त्या लॉजवर चिखलीचा गणेश देशमाने मॅनेजर म्हणून काम करायचा. तिथे दोघांचा परिचय झाला. लॉजवरील इतर ग्राहक बाहेर जाताना चावी लॉज काऊंटरवर ठेवायचे, मात्र पाटील चावी सोबत घेऊन जायचे. त्यामुळे पाटील यांच्याकडे जास्त पैसा असेल, असे गणेश देशमाने याला वाटत होतं. त्यामुळे त्यांचा गेम करायचा, असे गणेशने ठरवले होते.
पगार परवडत नसल्याचे कारण पुढे करुन घटनेच्या आठ दिवस आधी गणेशने लॉजवरील नोकरी सोडली होती. मात्र तरी फोनवरून तो गोड गोड बोलून पाटील यांच्या संपर्कात होता. ३१ डिसेंबरला मेहकर शहरातून वाईन शॉपवरून दारू सोबत घेत गणेशने उत्कर्ष पाटील यांना सारंगपूर भागात नेले. तिथेच धारदार शस्त्राने त्याने पाटील यांचा खून केला. मृतदेह शेतातील नाल्यात फेकून त्यावर गाजर गवत टाकून दिले. पोलिसांना घटनास्थळी दोन मोबाईल सापडले. त्यापैकी एक गणेश देशमाने तर दुसरा पाटील यांचा होता. पाटील यांचा खून झाल्यानंतरही त्यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून दोन वेळा पैसे काढल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी उत्कर्ष पाटील राहत असलेल्या लॉजवर आणि जेवायला जात असल्या ठिकाणी चौकशी केली.