no images were found
जोतिबा मंदिर जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्यांवर कारवाई
कोल्हापूर : श्री जोतिबा देवस्थानची सातारा, गोवा व कर्नाटक राज्यात असणारी सुमारे साडेतीनशे ते चारशे एकरपैकी दोनशे ते अडीचशे एकर जमिनीची परस्पर विक्री केल्याची माहिती समोर येत आहे. सात बारावर श्री जोतिबा देवस्थान असे नाव आहे; पण इतर हक्कात ज्यांची नावे लागली आहेत, त्या लोकांनी काही जमिनी आपल्याजवळ ठेवल्या आहेत, तर बहुतांश जमिनी परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास येत आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिंम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा देवस्थानच्या अशा जमिनीचा शोध घेऊन या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात घेणार आहेत. जोतिबा मंदिराच्या नावावर चारशे एकर जमीन आहे. उर्वरित अन्य तीनशे ते चारशे एकर जमीन कर्नाटक, गोवा, कोकण, सातारा येथे आहे. येथून जोतिबा मंदिरासाठी खंड येतो. मात्र, या जमिनी नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत. याची नोंद मात्र दिसून येत नाही. जेथे जमिनी आहेत. त्या ठिकाणच्या सातबारा उताऱ्यावर जोतिबा मंदिराचे नावे आहे. खंड देऊन ही जमिनी कसायला घेतली आहे. वर्षानुवर्ष जोतिबाची ही जमीन याच लोकांकडे आहे. याचा फायदा घेत, अनेकांनी कसायला असणारी जमीनच इतरांना परस्पर विक्री केली आहे. यामध्ये धनदांडगे, राजकीय, उद्योजक आणि जमीनदारांचा समावेश आहे. वर्षानुवर्ष ताब्यात असलेली जमीन आपल्याच मालकीची म्हणून दुसऱ्या पिढीतील जमीन करणाऱ्यांनी मनमानी कारभार केला आहे.
इतर हक्कातील नावाचा आधार घेत इतरांनाही जमीन विक्री केली आहे. याशिवाय ज्यांनी जोतिबा देवस्थानची जमीन घेतली आहे, अनेक मार्गांनी ही जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. श्री जोतिबा डोंगरावर ज्या-ज्या गावांतून मानाच्या सासनकाठ्या येतात. त्या-त्या गावात देवस्थानच्या जमिनी आहेत. जोतिबा देवस्थानच्या जमिनी कोणालाही विक्री केल्या असतील त्यांच्याकडून त्या परत घेता येणार आहेत. सुरुवातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना याबद्दल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याबाहेर असणाऱ्या जमिनींचा शोध घेतला जाईल.
जोतिबा देवस्थानकडे सध्या चारशे एकर जमीन आहे. आणखी तीनशे ते चारशे एकर जमीन कर्नाटक, सातारा, कोकण परिसरात आहेत. अनेकांनी या जमिनी परस्पर विक्री केल्या आहेत; मात्र सातबारावर जोतिबा देवस्थानचे नाव आहे. अशा सर्व जमिनींचा शोध घेऊन त्या पुन्हा देवस्थानच्या ताब्यात घेतल्या जातील. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तांनी दिली आहे.