no images were found
तीन चिमुरड्यांसह आईचा खून करुन कतारला फरारी झालेल्या आरोपीला तब्बल २८ वर्षांनी अटक
मुंबई: मीरारोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करुन फरार झालेल्या एका मारेकऱ्याला तब्बल २८ वर्षांपूर्वी जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी मुंबई पोलिसांनी केली आहे. राजकुमार चौहान असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्ये वास्तव्याला होता. तो गुरुवारी मुंबईत आला तेव्हा विमानतळावर अलगदपणे सुरक्षायंत्रणांच्या तावडीत सापडला.
राजकुमार चौहान आणि त्याचे साथीदार अनिल सरोज व सुनील सरोज यांनी २८ वर्षांपूर्वी जगरानी देवी (वय २७) आणि तिच्या तीन लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. यानंतर हे तिघेही फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या तिघांचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी राजकुमार चौहान पोलिसांच्या तावडीत सापडल्याने आता इतर दोन मारेकऱ्यांच्या माग काढणे शक्य होणार आहे. राजकुमार चौहान आणि सरोज बंधू हे १९९४ च्या सुमारास मीरारोडच्या कशमीरा परिसरातील पेणकरपाडा येथे वास्तव्याला होते. यावेळी त्यांच्या शेजारी जगरानी देवी प्रजापती यांचे कुटुंब वास्तव्याला होते. या तिघांनी जगरानी देवी यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर जगरानी देवी यांचे पती राजनारायण प्रजापती यांनी सर्व लोकांसमोर राजकुमार चौहान आणि सरोज बंधू यांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश केला होता.
यावेळी जगरानी देवी यांचा पती आणि या तिघांमध्ये मोठे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून राजकुमार चौहान आणि सरोज बंधुंनी १६ नोव्हेंबर १९९४ रोजी जगरानी देवी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा निर्घृणपणे खून केला होता. या लहान मुलांचे वय अनुक्रमे पाच, दोन आणि तीन महिने इतके होते. या तिघांनी जगरानी देवी आणि त्यांच्या मुलांवर चाकूचे वार करून त्यांना ठार मारले होते. जगरानी देवी यांचे पती रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर राजनारायण प्रजापती यांनी पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, तिन्ही मारेकरी फरार असल्याने या प्रकरणाचा तपास फारसा पुढे सरकला नव्हता. दरम्यानच्या काळात २००६ साली एका अपघातामध्ये राजनारायण प्रजापती यांचे निधन झाले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केस गेल्यावर्षी रिओपन झाली होती. त्यावेळी कशमीरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
जगरानी देवी यांच्या मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्यावेळी उत्तर प्रदेशात गेले होते. हे पथक तब्बल २० दिवस वाराणसीत ठाण मांडून बसले होते. तेव्हा पोलिसांना राजकुमार चौहान उर्फ काल्या उर्फ साहेब याच्याविषयी माहिती मिळाली होती. राजकुमार चौहान हा २०२०पासून कतारमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी समजले होते. या माहितीच्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी राजकुमार चौहान याच्या पासपोर्टची तपासणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. राजकुमार चौहान याला या सगळ्याची पुसटशी कल्पना नव्हती. त्यामुळे गुरुवारी तो मुंबई विमानतळावर आला तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.राजकुमार चौहान याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली असून त्याच्याकडून इतर दोन मारेकऱ्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.