no images were found
कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहिती पटाला फिल्मफेअरचा अवॉर्ड
कोल्हापूर : देशभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. अतिशय प्रतिष्ठेच्या या सोहळ्यामध्ये कोल्हापूरच्या सचिन सूर्यवंशी यांना वारसा या नावाच्या २५ मिनिटांच्या माहिती पटाला फिल्मफेअरचे अवॉर्ड मिळाले आहे. बेस्ट फिल्म नॉन फिक्शन या प्रकारात हे अवॉर्ड मिळालेले आहे.
चित्रपट सृष्टी सध्या शताब्दीकडे वाटचाल करत आहे. या चित्रपट सृष्टीमध्ये मध्ये दरवर्षी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा होत असतो. या प्रतिष्ठेच्या सोहळ्यामध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटाच्या माध्यमातून कोल्हापूरला प्रथमच मिळालेला आहे. वारसा या माहितीपटामध्ये मर्दानी खेळाची माहिती आणि महती सांगितलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळामध्ये निपुण होते म्हणूनच त्यांनी लढाया जिंकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मर्दानी खेळाचा वारसा आपण जपला पाहिजे असा संदेश या माहितीपटाने दिलेला आहे.
हा माहितीपट तयार करण्यासाठी सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमला दोन वर्षांचा कालावधी लागलेला आहे. त्यासाठी त्यांनी मर्दानी खेळाचा वारसा जपणाऱ्यांच्या मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत. मर्दानी खेळाचा शालेय क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा जपला जाईल असे सूर्यवंशी यांचे मत आहे. सुदैवाने इतिहासाचा समृद्ध वारसा असणाऱ्या ऐतिहासिक कोल्हापूरमध्ये काही जणांच्या कडून मर्दानी खेळांचा वारसा जपला जातो आहे हे विशेष म्हणावे लागेल. मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देणारे हे आता वार्धक्याकडे झुकलेले आहेत. त्यांच्यानंतर हा वारसा कोण जपणार हा मनाला अस्वस्थ करून सोडणारा प्रश्न आहे. मर्दानी खेळाला थेट फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात घेऊन जाणाऱ्या सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अटेंनबरो यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या चरित्रावर एक भव्य चित्रपट इंग्रजी आणि हिंदी भाषेत तयार केला होता. या चित्रपटाला ऑस्कर सोहळ्यात अनेक मानांकने मिळाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने चार पेक्षा अधिक ऑस्कर अवॉर्ड्स मिळून इतिहास रचला होता. वेशभूषा या प्रकारात श्रीमती भानू अथैया यांना ऑस्कर पारितोषक मिळाले होते. या भानू अथय्या म्हणजे कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या राजोपाध्ये घराण्यातील सुकन्या होत. त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. तेव्हाही कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते. श्रीमती भानू अथैया या हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत वेशभूषाकार होत. हे ऑस्कर पारितोषक घेऊन त्या कोल्हापुरात आल्या होत्या. कोल्हापूरच्या माध्यम प्रतिनिधीना त्या भेटल्या तेव्हा त्यांनी आपल्या सोबत ऑस्कर अवॉर्ड सुद्धा सोबत आणले होते.