no images were found
शिवसेना भवनाचाही शिंदे गट आता ताबा घेणार? दोन्ही गटात संघर्ष वाढणार
मुंबई : आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच एका आमदाराने केलेल्या विधानमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकाराने महाराष्ट्रातील वातावरण बिघडण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.
शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. आता शिवसेना भवनाकडे शिंदे गट चालून जाणार हे निश्चित मानलं जावू लागलं. आता याबाबत अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. राणा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतील. उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
रवी राणा म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या कार्यालयात बसून उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक टक्केवारीचे काम करत होते. यातून शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत होता. वास्तविक पाहता महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकपदही रद्द झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांचं टक्केवारीचं सुरु असलेलं काम बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आल्याचं रवी राणा यांनी म्हटलं. दरम्यान रवी राणा यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे गट शिवसेना भवनाचा ताब्यात घेणार असा दावा करण्यात आल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊत म्हणाले की “त्यांचे बाप आले पाहिजेत. एक बाप असेल तर येतील. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. शिवसेना भवन शिवसैनिकांचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू शिवसेनेच्या नावानेच राहील. ती आमची आहे, अशा वल्गना फार होतात, पण तुमच्याकडे औटघटकेची सत्ता असून ती सांभाळा. शिवसेना भवन ताब्यात घेण्याची भाषा वापरलीत तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.