no images were found
अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीला मिळेल जलसमाधी : आ. हसन मुश्रीफ
नागपूर : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या मुद्यावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का? अशी विचारणा राज्य सरकारला केली.
हसन मुश्रीफ म्हणाले की, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. याप्रमाणे अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल. महाराष्ट्राच्या सीमेपासून २३५ किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटकने अलमट्टी धरण बांधले आहे. या धरणामध्ये पाणी साठवण सुरुवात झाल्यापासून २००५, २००९, २०१३ आणि २०१९ असा चारवेळा महापूर आला आहे. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. असे असतानाही कर्नाटक सरकारने या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भिंत वगैरे बांधलेली आहे, फक्त २६ गेट बसवणे बाकी असून त्यासाठी त्यांनी निविदाही काढली आहे, २६९ दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत आहे.
लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहाचे जेष्ठ सदस्य मुश्रीफ यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाने नेमलेल्या तेजो वाकास इंटरनॅशनल या कंपनीनेही उंची वाढवण्याला समर्थन केले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या समितीने सुरुवातीला अलमट्टी धरणामुळे महापूर येत नसल्याचा निर्वाळा दिला. परंतु नंतरच्या काळात कर्नाटकने घातलेल्या बंधार्यांमुळेच महापूर येत असल्याचे स्पष्टीकरण नंदकुमार वडनेरे समितीने दिले आहे. त्यामुळेच, या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक सिम्युलेशन मॉडेल तयार केलेले आहे. त्यातून वास्तववादी निष्कर्ष समोर येतील. कर्नाटकला आमच्या अभ्यासातून निष्कर्ष येईपर्यंत हे काम थांबवण्याच्या सूचना करू, त्यांनी ते न थांबवल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ.