no images were found
पराभव पचवण्याची ताकद पाहिजे : सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वात संवेदनशील असणाऱ्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून वादाची ठिणगी पडली आहे. सोमवारी उचगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढताना ही निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पराभव पचवण्याची ताकद पाहिजे असा टोला सतेज पाटील यांनी लावला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालावरून सतेज पाटील आणि महाडिक गटात वादाची चिन्हे दिसत आहेत.
उचगावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. तसेच आचारसंहिता लागू असताना माजी मंत्र्यांनी कोपरा सभा घेतल्या, त्यांच्या पीएचा निकालात हस्तक्षेप झाला असून त्यामुळे निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. उचगावच्या ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चानंतर आ. सतेज पाटील यांनी नाव न घेता महाडिक गटाला टोला लगावला. सतेज पाटील म्हणाले की, लोकशाहीत परत निवडणुका घ्यायची पद्धत असती, तर आम्ही २०१९ ची निवडणूक घ्या म्हटले असते. आमची मागणी लोकसभेची होती.
पाटील पुढे म्हणाले की, ईव्हीएममध्ये मतदानाची नोंद होत असते. मतमोजणीवेळी पोलिंग एजंट असतात. संशय घेण्यापेक्षा निकाल मान्य केला पाहिजे, लोकशाहीत हे चालत असतं. तीन गावात आमचा सरंपच झालेला नाही, फेरमतदान घ्या म्हणून गांधीनगर, कंदलगाव असेल आम्ही मोर्चा काढलेला नाही. पराभव पचवण्याची ताकद पाहिजे. दरम्यान, उचगाव ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, आचारसंहितेच्या काळात माजी मंत्र्यांनी १७ डिसेंबरला सकाळी १० ते रात्री ११पर्यंत १ ते ६ वाॅर्डमध्ये पदयात्रा, कोपरासभा घेत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी विचारणा केल्यानंतर दमदाटी करण्यात आली. मतदानानंतर ईव्हीएम नेतानाही शासकीय अधिकारी नव्हता. त्यामुळे झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पुढील आठ दिवसात ग्रामस्थांना निर्णय न कळवल्यास निवडणूक प्रशासकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.