no images were found
नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराजांचे अपघाती निधन
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या कार अपघातात मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त आहे. काशी मधून कल्याण येथे मोडक महाराज आले होते. त्यानंतर रविवारी (ता.१८) रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी ते निघाले होते. दर महिन्यात ते एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन भक्तांना मार्गदर्शन करीत असत. त्याचसाठी ते निघाले होते परंतु पुणे-सातारा रस्त्यावर त्यांची गाडी दुभाजकाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सलग प्रवासामुळे चालकाला झोप लागल्याने अपघात घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे. श्री नवनीत्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक( वय ५४ रा. स्वामी समर्थ मठ कल्याण) कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष होते.
प्रथम मोडक महाराज यांनी कल्याणमधील मठाची स्थापना करून त्यानंतर मुरुड-जंजिरा, अलिबाग, ठाणे, डोंबिवली व सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये त्यांनी डोंगरपाल-डिंगणे, तुळस, कलंबिस्त, आंबोली, उपवडे, झाराप, डिगस, देवगड येथे मठांची स्थापना केली होती. त्यांचे एकूण १४ मठ असून ठिकाणी ७ ठिकाणी मठाचे काम सुरू होते. धार्मिक कार्यास्तव त्यांचे देवगड -सिंधुदुर्गमध्ये जाणेयेणे होते. त्यांचे जिल्ह्यातील सर्व मठांना भेटी देण्याचे नियोजन होते. परंतु त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. महाराजांच्या अपघाती निधनाने त्यांच्या भक्तगणांत शोककळा पसरली आहे. कल्याण येथे त्यांचे पार्थिव आज दिवसभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.