Home सामाजिक डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया’ ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया’ ग्रंथाचे प्रकाशन

5 second read
0
0
89

no images were found

डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : फुले-आंबेडकरी विचारांतच स्त्री-पुरूषादी समग्र समानतेची बीजे रुजलेली आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग प्रमुख तथा साहित्यिक डॉ. वंदना महाजन यांनी आज सायंकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आज डॉ. दीपा श्रावस्ती लिखित ‘आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया’ (विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट) या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. वंदना महाजन यांनी आपल्या भाषणात अगदी वेदकाळापासून स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि योगदानाचा वेध घेतला. त्या म्हणाल्या, एकीकडे स्त्रीचे देवतेपासून ते आईपर्यंतचे स्वरुप समाज दाखवित होता, त्याचवेळी दुसरीकडे व्यवस्थेच्या विरोधातील स्त्रियांचे मात्र नकारात्मक चित्रण करीत होता. त्यामुळे महिलांचे सामाजिक स्थान हे सातत्याने पुरूषी आक्रमकपणापुढे आकुंचित झाले. समग्रापासून स्त्रियांचा धागा तुटला. हा खंडित झालेला धागा फुले-आंबेडकरी चळवळीने पुन्हा जोडण्याचे काम केले. धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांची सखोल चिकित्सा करून घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समग्र समानता प्रदान केली.

डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या संशोधनातून बाबासाहेबांच्या चळवळीमधी स्त्रियांचे योगदान प्रकर्षाने सामोरे येतेच, पण त्यातून विविध नवीन संशोधन प्रकल्पांचे सूचनही होते, असे कौतुकही डॉ. महाजन यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा अनेकांगांनी वेध घेत राहण्याची आवश्यकता आहे. हिंदू कोड बिल प्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कोल्हापुरात प्रथमच आल्यानंतर सन १९५२मध्ये येथील विविध जातीधर्मांच्या नऊ महिला मंडळांनी त्यांना विशेष मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. स्त्रीमुक्तीची बीजे या देशात रोवणारा तो क्षण होता. डॉ. श्रावस्ती यांनी एक उत्तम संशोधनग्रंथ साकारला असून येथून पुढे या विषयाच्या अनुषंगाने संशोधनकार्य पुढे चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. दीपा श्रावस्ती यांनी हा संशोधनग्रंथ म्हणजे आपल्या सर्व पूर्वमातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असून वर्तमानातील महिलांना प्रेरित करण्यासाठी केलेली कृती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते ‘विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. केंद्राचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. हरिष भालेराव, डॉ. गिरीष मोरे, डॉ. प्रभाकर निसर्गंध, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. योगेश साळी, डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, विलास सोयम आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …