
no images were found
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दिवंगत आपदामित्र राजशेखर मोरे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचा धनादेश
कोल्हापूर : दिवंगत आपदा मित्र राजशेखर प्रकाश मोरे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. हा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्व. राजशेखर मोरे यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला. हा धनादेश स्व. राजशेखर मोरे यांच्या पत्नी श्रीमती उषा राजशेखर मोरे यांनी स्वीकारला. यावेळी परीविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, निवासी उप जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, करवीर तहसीलदार शीतल मुळे -भामरे, तहसीलदार (सर्वसाधारण शाखा) अर्चना कापसे आदी उपस्थित होते.
आपदामित्र दिवंगत राजशेखर प्रकाश मोरे यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरुन आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनीही सामाजिक बांधिलकीतून दिवंगत मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते.
माजलगांव, जिल्हा- बीड येथील एक डॉक्टर माजलगाव धरणात बुडाल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी माजलगाव धरणात एक व्यक्ती बुडाली असून तिचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील स्क्यूबा डायव्हिंग करणारे पथक पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने १० स्वयंसेवकांचे पथक दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी बीड जिल्ह्यात पाठविले होते. पथकाने दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता माजलगाव धरणात शोध कार्य सुरु केले होते. आपदामित्र राजशेखर प्रकाश मोरे या स्क्युबा डायव्हर्स (गोताखोर) नी स्क्युबा किट घालून पाण्यात उतरुन बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरु केला असता या घटनेमध्ये राजशेखर प्रकाश मोरे यांचा मासे पकडण्याच्या जाळीत अडकून बुडून मृत्यू झाला होता.
दिवंगत राजशेखर प्रकाश मोरे यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर मार्फत आपदामित्र कार्यक्रमा अंतर्गत निवड होवून आपदामित्र म्हणून सन २०१९ मध्ये दिनांक २० ते ३१ मे २०१९ या कालावधी मध्ये प्रशिक्षण झाले होते. ते अत्यंत यशस्वी आपदामित्र म्हणून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी होत होते. सन २००१९, २०२१ च्या पूरस्थिती मधील शोध व बचाव, कोरोना कालावधीतील मदतकार्य, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कोणतीही पाण्यात बुडून मृत्यूची घटना घडली की, राजशेखर प्रकाश मोरे त्वरीत स्क्युबा डायव्हिंग तंत्राचा वापर करून बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेत असत. विविध आपत्कालीन घटनामध्ये दिवंगत राजशेखर प्रकाश मोरे या आपदामित्राने आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव आदी कार्यात यशस्विरीत्या सहभाग घेतला होता.