
no images were found
नशामुक्तीसाठी युवा वर्गामध्ये जनजागरण आवश्यक अभियानाच्या जिल्हास्तरीय बैठकीत ठरला आराखडा
कोल्हापूर : ‘नशामुक्त अभियाना’ च्या माध्यमातून युवावर्गामध्ये प्रभावी पध्दतीने व्यसनमुक्तीसाठी जनजागरण करण्याचा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नशामुक्त अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये समितीची बैठक झाली. त्यामध्ये नोव्हेंबर २०२३ पर्यंत राबवावयाच्या उपक्रमांचा आराखडाही तयार करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुष्का गुप्ता आणि अनू मौर्य हे उपस्थिती होते.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागरण, प्रदर्शने, व्याख्याने, कार्यशाळा, चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धाच्या माध्यमातून नशामुक्तीसाठीचे वातावरण तयार करण्यासाठी चर्चा झाली. समिती सदस्य आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते समीर देशपांडे यांनी यावेळी व्यसनातून बाहेर पडून यशस्वी जीवन जगणाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची, अशांची माहिती पुस्तिकेव्दारे प्रसारित करण्याबाबत सूचना केली. समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात त्यांच्या माध्यमातून जनजागरण करावे, अशी सूचना सायबरचे प्रा. सुरेश आपटे यांनी केली.
कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने आरोग्य विभाग, महिला आणि बालविकास, माध्यमिक शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व्यसनांचे होणारे गंभीर परिणाम समाजापर्यंत पोहोचवण्याचे यावेळीनिश्चित करण्यात आले. यावेळी मिलिंद शिंदे,अक्षय पाटील, भिमराव टोणपे, प्रतिभा सावंत, पूजा धोत्रे, रविंद्र ठोकळ, आशा रावण, एस. बी. टिपुगडे हेही उपस्थित होते.