
no images were found
लग्न करण्याचा तगादा लावला म्हणून ४९ वार करून प्रेयसीचा खून
सुरत : सुरत शहरातल्या अमरोली पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात २८ नोव्हेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वरमधल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे. त्याने तरुणीवर ४९ वार करून तिचा जीव घेतला. एका ‘टी-शर्ट’मुळे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुरत शहरातल्या वाहतूक आणि गुन्हे विभागाचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरोली पोलीस स्टेशन हद्दीतल्या अंजनी इंडस्ट्रियल एरियाजवळच्या एका शेतात पोलिसांना चाकूचे अनेक वार असलेल्या एका मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीच्या शरीरावर चाकूचे ४९ वार होते. त्यानंतर सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृत तरुणीचं नाव कुनीदास सीमादास असून, ती ओडिशातल्या भुवनेश्वरची रहिवासी असल्याचं तपासात निष्पन्न झालं. तिचे भुवनेश्वरमधल्याच जगन्नाथ गौडा नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. त्यामुळे ती वारंवार तिच्या प्रियकराला लग्नासाठी विचारत होती; पण जगन्नाथला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे त्याने तिच्यापासून सुटका मिळवण्याची योजना आखली.
आरोपीने कुनीदासला सुरतला येण्यास सांगितलं. तीदेखील काहीही विचार न करता आपल्या कुटुंबाला सोडून प्रियकरासह रेल्वेने सुरतला आली. तिथे आल्यानंतर प्रियकर जगन्नाथ तिला ऑटोने घटनास्थळी घेऊन गेला आणि चाकूनं भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर तो भुवनेश्वरला परत गेला व आपलं दैनंदिन जीवन जगू लागला. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर आसपासच्या परिसरात चौकशी करण्यात आली. शहरातलं बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह परिसरातल्या सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात आली होती; मात्र टीमला कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर मुलीनं घातलेल्या टी-शर्टच्या आधारे तपास करण्यात आला. टी-शर्टमुळे ती भुवनेश्वरची असल्याचं समजलं. प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीतल्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अधिक चौकशी सुरू आहे. या हत्येत त्याच्याशिवाय आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.