no images were found
युपीप्रमाणे लव जिहाद रोखण्यासाठी कायदा महाराष्ट्रात करावा अशी भाजपची मागणी : चित्रा वाघ
कोल्हापूर : कोल्हापुरात लव्ह जिहाद सारख्या घटना घडलेल्या आहेत. आंदोलन केल्यानंतर पोलीस कारवाई करतात आणि पिडित मुलींना हजर करतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, त्यांना अभय दिले जाणार नाही . उत्तर प्रदेशात धर्तीवर लव जिहाद रोखण्यासाठी कायदा महाराष्ट्रात करावा अशी आमच्या पक्षाची मागणी आहे, अशी माहिती भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.
भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या राज्याच्या दौऱ्यावर असून आज पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला त्यांची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाली. आज बुधवारी सकाळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या , महिला सुरक्षा हा पक्षाच्या मुख्य अजेंडा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग, खून, महिलांची बोटे तोडणे, कोरोना कॉरंटाईन विभागातील उपचार घेणाऱ्या महिलांवर बलात्कार अशा घटना घडल्या होत्या. महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारकडे विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली होती पण त्यावेळच्या सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. आज ही महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना घडत आहेत. पण शिंदे फडवणीस सरकार सक्षम आहे असा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार प्रकरणी कारवाईस विलंब करणाऱ्या एक डझनहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांवर शिंदे फडवणीस सरकारने कारवाई केली आहे. काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
निर्भया पथकातील वाहने फडणवीस शिंदे सरकारच्या दिमतीला या विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना वाघ म्हणाल्या, केंद्र सरकारच्या निधीतून निर्भय पथकाचे वाहने राज्याला मिळालेली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्रीही आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेच्या पथकात निर्भय पथकाची वाहने होती. सध्याच्या सरकारच्या ही गोष्ट लक्षात येताच मंत्र्यांच्या पथकातील वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबई पोलिसांच्या पथकातही निर्भया पथकाची वाहने दाखल झाली आहे असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
शक्ती कायद्याला केंद्र सरकारकडून विलंब होत आहे या आमदार रोहित पवार यांच्या आरोपासंबंधी विचारले असता त्या म्हणाल्या शक्ती कायद्याला भाजपने पहिल्यापासून पाठिंबा दिला आहे. त्यावेळी असलेल्या विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांनीही हा कायदा संमत होण्यासाठी मदत केली होती. शक्ती कायद्याबरोबर राज्यात सध्या अस्तित्वात असलेले महिला अत्याचार संदर्भातील कायदे सक्षम आहेत. पण अशा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. तरीही शक्ती कायद्याचे आमच्या पक्षाकडून स्वागत आहे. अशा कायद्यांचा प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला वरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस खाते सक्षम आहे पण त्याचबरोबर नागरिकांचेही तेवढेच दायित्व आहे. महिलांवरील अत्याचार होत असताना नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे असेही त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे ,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शमिका महाडिक, शहराध्यक्ष गायत्री राऊत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व मंत्री आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथकासाठी दिलेली वाहने होती,असा पलटवार भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. विद्यमान सरकारने आता ही वाहने पुन्हा मुंबई पोलीस आणि निर्भया पथकाकडे पाठवली जात आहेत, अशी ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. निर्भया पथकातील वाहने शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यात या विरोधकांच्या आरोपावर त्यांनी माहिती दिली.