
no images were found
पत्रकारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. संभाजी खराट
पत्रकारिता विभागात इंडक्शन कार्यक्रम:फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर : “पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नव तंत्रज्ञान आत्मसात करावे”, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक (माहिती) डॉ. संभाजी खराट यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागाच्या वतीने आयोजित इंडक्शन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. खराट म्हणाले,पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नवे बदल स्वीकारायला हवेत. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंतच्या सर्व घडामोडींचे नीट आकलन करून घ्यायला हवे. वाचनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. वाचनातून पत्रकारिता समृद्ध बनवता येऊ शकते.
डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले, अलीकडे डिजिटल माध्यमांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवीत. पत्रकारितेमध्ये होणारे बदल आणि माध्यम संस्थांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळांचा अभ्यास करून त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी करायला हवी.
स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले. डॉ. शिवाजी जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी विभागातील उपक्रमांची माहिती सादर केली. याप्रसंगी सुधाकार शिंदे, झरीन जमादार, साईसिमरन घाशी, शिवानी नागराळे, कारण शिंदे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. जावेद तांबोळी आणि प्राजक्ता शहा यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन पत्रकारिता विभागामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. संभाजी खराट यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन दि. १९ डिसेंबर पर्यंत पाहण्यासाठी सर्वांना खुले आहे.