
no images were found
मुलाने पित्याच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले
बागलकोट : एका निर्दयी मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केली. आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून ते बोअरवेलमध्ये फेकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी तातडीने आरोपी मुलगा विठ्ठलला अटक केली. या घटनेला कर्नाटकातील श्रद्धा हत्याकांड म्हटले जात आहे.
मुधोळ परिसरात आरोपी मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेहाचे ३० तुकडे केले आणि नंतर बोअरवेलमध्ये फेकले. आरोपीचे वय २० वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. विठ्ठल असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याचे वडील परशुराम जेव्हा जेव्हा दारूच्या नशेत असायचे ते त्याला मारहाण करायचे आणि त्याच्याशी नेहमी भांडायचे. वडिलांची हत्या केल्यानंतर विठ्ठल घाबरला आणि त्याने वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. आरोपीला मुलाला मृतदेह मुधोळ शहराच्या हद्दीत असलेल्या त्याच्या शेतातील बोअरवेलमध्ये टाकायचा होता. त्याने तसा प्रयत्न देखील केला. मात्र, तो मृतदेह बोअरवेलमध्ये टाकू शकला नाही. त्यानंतर आरोपी विठ्ठलला मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सूचत नव्हतं. मग त्याला एक भयानक कल्पना सुचली. त्यानंतर धारदार शस्त्राने या नराधमाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. आरोपीने वडिलांच्या मृतदेहाचे ३० तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे आपल्या शेतातील बोअरवेलमध्ये फेकून दिले. वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने मुलाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, शनिवारी तो घरी परतला आणि वडिलांशी झालेल्या छोट्या भांडणानंतर आपण घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी त्याला त्याच्या वडिलांबद्दल विचारले असता, त्याने आपल्याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. परशुरामचा शोध घेण्यात आला. त्यांच्याबद्दल मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विचारणा केली. पण त्यांना काही सुगावा लागला नाही.
जसजसा तपास वाढत गेला तसतसा पोलिसांना विठ्ठलवर संशय येऊ लागला. त्याआधारे पोलिसांनी सोमवारी विठ्ठलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी विठ्ठलची कोठडीत चौकशी केली असता, आधी तो पोलिसांसमोर स्वत:ला निर्दोष सांगत होता. त्याला काहीच माहीत नाही, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी कडक शब्दात चौकशी केली असता त्याने सत्य सांगितले. त्याने आपल्या वडिलांची हत्या कशी केली आणि मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट कशी लावली हे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेसीबी मशिनने शेतात खोदकाम केले. जेसीबी मशिनने शेतात खोदकाम सुरू असताना पोलिसांनी परशुरामच्या मृतदेहाचे काही तुकडे जप्त केले. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी विठ्ठलला अटक केली. या घटनेला कर्नाटकातील श्रद्धा हत्याकांड म्हटले जात आहे.