
no images were found
“श्रीदेवी इतकी प्रेमळ होती की मला जितकी गरज असेल, तितके वेळा माझ्याबरोबर नृत्याचा सराव करण्यास ती तयार होत असे!”
‘झी टीव्ही’वर सुरू असलेला ‘सा रे ग म प’ हा सर्वाधिक काळ सुरू असलेला गायन क्षेत्राशी संबंधित रिअॅलिटी कार्यक्रम असून गेली तीन दशके त्याने आपली मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर घातली आहे. या कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या श्रेया घोषाल, शेखर रविजानी, कुणाल गांजावाला, सुगंधा मिश्रा, कमाल खान, राजा हसन, वैशाली माडे वगैरे अनेकांनी नामवंत गायक-संगीतकार म्हणून आपली यशस्वी कारकिर्द उभी केली आहे. आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या नवव्या आवृत्तीत या सर्वात प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर काही गुणी बालगायकांना ‘झी टीव्ही’ वाहिनी आपली कला सादर करण्याची संधी देणार आहे. या कार्यक्रमाचे नवे परीक्षक म्हणून नामवंत संगीतकार शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीति मोहन हे काम पाहणार असून भारती सिंग ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत सर्वांचे मनोरंजन करणार आहे.
आपल्या अफलातून गायनकलेने यातील टॉपच्या 10 स्पर्धकांनी सर्वांवर आपला प्रभाव टाकला असला, तरी येत्या वीकेण्डच्या भागात प्रेक्षकांना एक सरप्राईझ पाहायला मिळेल. कारण ‘द डान्सिंग हिरोज’ नावाच्या या विशेष भागात बॉलीवूडचे नामवंत अभिनेते जीतेंद्र आणि गोविंदा हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. सर्वच गुणी लिटल चॅम्प्सनी आपल्या सुमधुर आवाजाने अफलातून कामगिरी करून दाखविली असली, तरी यावेळी राफा आणि प्रज्योत यांनी गायलेल्या ‘ताकी ओ ताकी’ आणि ‘ओ लाल दुपट्टेवाली तेरा’ या दोन गाण्यांमुळे जीतेंद्र यांनी हिम्मतवाला चित्रपटातील आपली सहकलाकार दिवंगत श्रीदेवी हिचा एक रंजक किस्सा सांगितला.
जीतेंद्र म्हणाले, “श्रीदेवी ही महान कलाकार होती. मला अजूनही आठवतंय की मी जेव्हा जेव्हा तिच्याबरोबर नृत्याचा सराव करीत असे, तेव्हा तिला ते नृत्य लगेचच समजत असे. पण मला त्यासाठी सहा-सात वेळा सराव करावा लागत असे. तिला अधिक कष्ट पडू नयेत, यासाठी मी तिला सांगत असे की मी नृत्यदिग्दर्शिकेबरोबर सराव करीन. पण श्रीदेवी इतकी नम्र आणि प्रेमळ होती की ती मला नृत्य नीट जमेपर्यंत ती माझ्याबरोबरच नृत्याचा सराव करण्यास तयार असे. तिने मला असा आदर दिला.” जीतेंद्र यांनी जरी हा रंजक आठवण सांगितली असली, तरी तुम्हाला या सर्व स्पर्धक लिटल चॅम्प्सकडूनही असे किस्से ऐकायला मिळतील.