
no images were found
आफताबच्या कुटुंबियांची चौकशी करुन त्यांनाही कठोर शिक्षा व्हावी : विकास वालकर
मुंबई : श्रद्धाची निर्घृण हत्या करणाऱ्या अफताब पुनावाला याच्या कुटुंबियांची चौकशी करुन त्यांनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. विकास वालकर म्हणाले, “न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे . अफताब पुनावाला यानं माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेनं हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. तसेच त्याच्या कुटुंबातील आई-वडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. तसेच या कटात इतर कोणी सामील झाले असतील तर त्यांची चौकशी करुन त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मी अपेक्षा करतो”
“मी फक्त एक वेळेस आफताबच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याच्या आईसोबत माझं बोलणं झालं होतं. पण मला तेव्हा व्यवस्थित उत्तर देण्यात आलं नाही. श्रद्धाने 2019मध्ये पोलिसांत तक्रार केली होती याची मला माहिती नव्हती. 26 सप्टेंबरला आफताबसोबत माझं बोलणं झालं तेव्हा मी त्याला विचारलं की माझी मुलगी कुठे आहे? ती तुझ्यासोबत दोन-अडीज वर्ष राहत होती. तेव्हा त्यानं मला सांगितलं की मला माहित नाही ती कुठे गेली. यावर मी त्याला म्हटलं की ही तुझी जबाबदारी आहे. त्यावर तो काहीही बोलला नाही” अशी माहितीही यावेळी विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. सीमा कुशावह या सर्वोच्च न्यायालयातल्या वकील आहेत. त्या निर्भया ज्योती ट्रस्टच्या संस्थापिकाही आहेत. बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली आहे. त्यांनी निर्भया आणि हथरस बलात्कार प्रकरणातल्या पीडितांची बाजू न्यायालयात मांडली आहे. २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण निर्भया प्रकरण म्हणून ओळखले जाते. तसेच हथरसमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये एका १९ वर्षीय दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांमधल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सीमा कुशावह यांनी काम केलेलं आहे.