no images were found
महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात ‘महामोर्चा’; मविआची घोषणा
मुंबई : महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मविआच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे.यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातील सरकार आता कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान होतोय. फुटिरतेची बीज इथं रोवली जात आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न सुरु आहे. केवळ राज्यपाल आहेत म्हणून त्यांचा सन्मान राखावा लागतोय. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, अस्तित्व छन्नविछिन्न करुन टाकायचं आहे. ”
गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून यांनी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. त्यानंतर आता कर्नाटकची निवडणूक पण होणार आहे, त्यामुळं महाराष्ट्राची गावं ते कर्नाटकला जोडणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक झाली त्यानंतर आमच्या मित्र पक्षांशी बोलल्यानंतर सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी १७ डिसेंबरला शनिवारी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा विराट मोर्चाचं मविआनं आयोजन केलं आहे. यामध्ये केवळ मविआचं नव्हे तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन झालेला नाही त्यांनी महाराष्ट्राच्या एकजुटीचं विराट दर्शन या मोर्चातून घडवावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.