no images were found
अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी १४ ऑक्टोबरला विशेष शिबिर
आर.के.नगर येथील खडीचा गणपती मंदिर हॉलमध्ये आयोजन ; नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर,: कोल्हापूर शहराच्या हद्दीला लागून असलेल्या ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आर.के.नगर येथील खडीचा गणपती मंदिर हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
या शिबिरामध्ये केवळ अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून देण्यात येणार आहेत. संबंधित नागरिकांनी कनेक्शन अधिकृत करण्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना अथवा बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र, घरफाळा पावती, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला किंवा हमीपत्र तसेच शेजारील घराचे पाणी बिल आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना संबंधित कनेक्शनधारकांनी २५ हजार रुपये दंड भरल्याची पावतीही आवश्यक कागदपत्रांसोबत जोडणे बंधनकारक आहे. कनेक्शन मंजूर झाल्यानंतर घरगुती कनेक्शनसाठी १० हजार रुपये, व्यापारी (बिगर घरगुती) कनेक्शनसाठी १५ हजार रुपये आणि औद्योगिक कनेक्शनसाठी २० हजार रुपये इतकी न परतावा अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच नळ कनेक्शन मंजुरीसाठी महापालिकेच्या नोंदणीकृत प्लंबरमार्फत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या शिबिरात प्राप्त होणारे अर्ज दि. १४ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अधिकृत करून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मुदतीनंतर अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आल्यास संबंधित नागरिकांवर २५ हजार रुपये दंड आकारण्यासह फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
तरी शहरालगतच्या ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपली नळ जोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी बळवंत सूर्यवंशी (९७३०५१३६८०) किंवा अजित मोहिते (९७६६६४४७५४) यांच्याशी संपर्क साधावा.