no images were found
आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
४१२ स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
कोल्हापूर, : ‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महानगरपालिकेच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या ४१२ सफाई मित्र व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे, आजारांचे लवकर निदान करणे तसेच त्यांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसह आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ECG, X-Ray यासह डोळे, दात तसेच कान-नाक-घसा यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सल्ला व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे नियमितपणे लक्ष देणे, संभाव्य आजारांचे वेळीच निदान करणे आणि गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध झाले.
या शिबिरास उपायुक्त राजेंद्र मुतकेकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पवार, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता भिसे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रुपाली यादव यांच्यासह तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मुंबईचे उपसंचालक डॉ. सचिन देसाई तसेच RCH नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी केली. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.