no images were found
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
कोल्हापूर, : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निसुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी अधिष्ठाता यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही, रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर, अग्निशामक यंत्रांचा वापर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीतील सूचनांनुसार शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता रुग्णालयाच्या आवारात अग्निसुरक्षेबाबत मॉकड्रील घेण्यात आले. आग लागल्याची आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरून त्यावेळी करावयाची कार्यवाही, अग्निशामक यंत्रांचा योग्य पद्धतीने वापर, रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर, बचावकार्य तसेच विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
रुग्णालयामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणतीही जीवितहानी होऊ नये तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षितपणे बाहेर काढता यावे, यासाठी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणे हा या मॉकड्रीलचा प्रमुख उद्देश होता. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे.
या मॉकड्रीलमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे तसेच इतर अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले. या मॉकड्रील वेळी अधिष्ठाता डॉ. सदानंद मिसे, वैद्यकीय अधिक्षक राजेंद्र मदने, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, प्राध्यापक व बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. भुषण मिरजे, डॉ. स्वाती भिवसे, अधिसेविका तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान यांनी या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग नोंदविला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.