Home शासकीय हवाईदलातील विमानांची कमतरता कशी दूर करणार?

हवाईदलातील विमानांची कमतरता कशी दूर करणार?

8 second read
0
0
26

no images were found

हवाईदलातील विमानांची कमतरता कशी दूर करणार?

 

भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक राफेल, बहुउद्देशीय सुखोई, मिग श्रेणीतील विविध प्रकार, जॅग्वार, मिराज- २००० आदी लढाऊ विमानांचा ताफा आहे. चीन व पाकिस्तान अशा दुहेरी धोक्यांचा सामना करण्यासाठी हवाईदलास लढाऊ विमानांच्या एकूण ४२ तुकडया मंजूर आहेत. मात्र सध्या दलात केवळ ३१ तुकडया आहेत. म्हणजे लढाऊ विमानांची निकड व उपलब्धता यामध्ये ११ तुकडयांची कमतरता आहे. विद्यमान क्षमतेत संपूर्ण देशात लक्ष ठेवणे, हवाई गस्त घालण्यास मर्यादा येतात. ‘सीमावर्ती भागातील बदलत्या परिस्थितीत संख्यात्मकतेऐवजी उत्तम रणनीतीने प्रतिकार केला जाईल,’ असे हवाईदलाने म्हटले, ते या पार्श्वभूमीवर!
पुढील १० ते १५ वर्षे लढाऊ विमानांच्या ४२ तुकडयांच्या बळापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. कारण या काळात प्राप्त होणाऱ्या व निवृत्त होणाऱ्या विमानांचा विचार करता दल ३५ तुकडयांचे राहील, असे मध्यंतरी खुद्द हवाईदल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी नमूद केले होते. सध्या ताफ्याची भिस्त सांभाळणारी जुनी विमाने दलातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडू लागतील. मिग-१ च्या तीन तुकडयांची जागा २०२५ पर्यंत तेजस एमके १ ए विमाने घेतील. जॅग्वार, मिराज- २००० आणि मिग-२९ चालू दशकाच्या अखेपर्यंत निरोप घेण्यास सुरुवात होईल. मिग-२९ विमाने २०२७-२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. यामुळे सध्याची क्षमता कायम राखणे आव्हानात्मक ठरू शकते. शिवाय, गेल्या २३ वर्षांत अपघातांमुळे १२ सुखोई विमाने गमवावी लागली.
भारतीय हवाईदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या ३१ तुकडया असून २०२९ पर्यंत त्या कमी होऊ शकतात, असे संसदीय संरक्षणविषयक स्थायी समितीचे निरीक्षण आहे. दलाकडे नव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या दोन तुकडया असतील. लढाऊ विमानांची शक्ती कायम राखण्यासाठी तेजस व बहुउद्देशीय मध्यम लढाऊ विमान निर्मिती महत्त्वाची आहे. ११४ एमआरएफए विमाने परदेशातून- बहुधा स्वीडनहून- खरेदी केली जाणार असली तरी त्यांची बांधणी देशांतर्गत होईल. ‘या प्रस्तावाला मान्यता देण्याची गरज’ समितीने अधोरेखित केली. ११४ एमआरएफए विमानांच्या प्रस्तावात प्रगती झाल्यास तुकडयांची संख्या २०३० पर्यंत २९ ते ३१ दरम्यान असेल, असे हवाई दलाच्या प्रतिनिधीने संसदीय समितीसमोर मांडले होते.
हवाई दलात तेजसच्या साधारणत: १० तुकडया (स्क्वाड्रन) स्थापण्याचे नियोजन आहे. प्रारंभी एचएएलकडे ८३ तेजस एमके-१ ची मागणी नोंदविली गेली. नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे विकसन प्रक्रियेतील तेजस एमके-२ हे विमान नंतर समाविष्ट केले जाईल. दोन्ही प्रकारची सुमारे १८० विमाने खरेदीचे नियोजन आहे. संरक्षण सामग्रीवरील परावलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांना बळ दिले जात आहे. त्या अनुषंगाने प्रगत मध्यम लढाऊ विमानावर (एएमसीए) काम सुरू आहे. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार तेजसच्या वितरणास विलंब झाला. काही वर्षांपूर्वीच ४० विमाने मिळणे अपेक्षित होते. ती आता मिळत आहेत.
B तंत्रज्ञान हस्तांतर करारान्वये रशियन बनावटीच्या सुमारे २२० सुखोईची बांधणी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात झाली होती. तो कार्यक्रम २०२० मध्ये पूर्ण झाल्यानंतर, सरकारने नव्याने मागणी न नोंदविल्याने सध्या या ठिकाणी केवळ सुखोईची दुरुस्ती (ओव्हरहॉल) आणि तत्सम कामे केली जातात. अलीकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलकडून ११ हजार कोटींची १२ सुखोई ३० एमकेआय विमाने खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या विमानात ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असेल. नाशिकच्या प्रकल्पात कायमस्वरूपी साडेतीन हजार कामगार तर दीड हजार अधिकारी असे पाच हजार जण कार्यरत आहेत. कामाअभावी कंत्राटी कामगारांमध्ये निम्म्याने कपात करण्याची वेळ आली. नव्या मागणीमुळे तीन वर्षांच्या खंडानंतर नाशिकमध्ये पुन्हा सुखोईची बांधणी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्य…