no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार
पुष्पाच्या हृदयस्पर्शी आणि संबद्ध कथानकामुळे सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिका प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. मालिकेच्या कथानकात आता एक दमदार आणि प्रेरणादायक वळण येत आहे. पुष्पा (करुणा पांडे) तिच्या जीवनातील एका महत्त्वाच्या क्रॉसरोड्सवर उभी आहे आणि येथून ती कायद्याचा अभ्यास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वळणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रोफेसर राजवीर (गौरव चोप्रा)च्या एंट्रीमुळे तिच्या प्रवासाला एक नाट्यमय कलाटणी मिळालेली दिसेल. आता तिच्यापुढे नवीन आव्हाने आणि अनपेक्षित भावनिक खळबळ असेल.
आगामी भागांमध्ये, निवृत्त झालेला शिपाई घनश्याम (मुकुल श्रीवास्तव) याला मदत करण्याच्या पुष्पाची योजना उलटल्यामुळे तिला थोडे मागे हटावे लागले आहे. त्यात दिलीप (जयेश मोरे) आणि बापोद्रा (जयेश भारभाया) यांना अटक झाली आहे. घनश्यामला तर पेन्शन मिळते, पण पुष्पावर मात्र कादंबरी (वृंदा त्रिवेदी) मोठा आळ घेते. जुगल (अंशुल त्रिवेदी) सोबत पुष्पाची वाढती घनिष्ठता कादंबरीला आवडत नाही, आणि ती चिराग (दर्शन गुर्जर) विरुद्ध एक कट रचते. या सगळ्या भावनिक गोंधळात, प्रोफेसर राजवीर शास्त्रीचे हे विधान की, ‘कायदा हा सामर्थ्यवान लोकांसाठी असतो’ पुष्पाला हादरवून सोडते. कॉलेजच्या डिबेट दरम्यान त्या दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र होतो. तेथे पुष्पाची व्यावहारिक हुशारी धुडकावून लावली जाते. पण एका विद्यार्थ्याच्या समर्थनात शास्त्रीच्या निर्विकार चेहऱ्यामागची खळबळ उघड होते. पुष्पा जेव्हा मॉक ज्यूरीमध्ये दाखल होते, तेव्हा तिला समजते की या प्रकरणात शास्त्रीच्या मनातील वेदना प्रतिबिंबित होत आहे. हे समजल्यावर आणि घनश्यामचा संघर्ष पाहिल्यावर पुष्पा एक धाडसी पाऊल उचलते- ती कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेते. अशाप्रकारे तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आता होत आहे.
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “पुष्पाच्या आजवरच्या आयुष्यातील हा एक खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. कायदा शिकण्याचा निर्णय हा केवळ तिचा व्यक्तिगत माइलस्टोन नाही, तर तिने अशा प्रत्येक महिलेला एक संदेश दिला आहे ज्यांना वाटते की ‘काही नवीन सुरुवात करण्यासाठी आता उशीर झाला आहे’. पुष्पा नेहमी आपल्या अंतःप्रेरणेने, मनाने प्रेरित होऊन कृती करते. चिकाटी तर तिच्यात आहेच. आणि आता ती कायद्याचे ज्ञान संपादन करून स्वतःला अधिक सक्षम करणार आहे. एक अभिनेत्री म्हणून हा बदल खूप सार्थक आहे. मला स्वतःला देखील मनापासून असे वाटते की तुमचे वय 25 असो वा 50, सुरुवात केव्हाही करता येऊ शकते. पुष्पाचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.”