no images were found
देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी : विरोधकांनी राजकारण टाळत संसदेत मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आवाहन
पुणे:-केंद्र सरकारने नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात अत्यंत गांभीर्याने कारवाई करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषी आणि जबाबदार व्यक्तींना अटक करून कारागृहात पाठवले आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नसून, दोषींना कठोर शिक्षा मिळणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी मांडली आहे. राजधानीतील जंतर-मंतरवर तसेच देशभरातील विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेत देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले यांनी मांडलेल्या भूमिकेची माहिती देताना डॉ.चलवादी म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला तर्कशीलता आणि बंधुत्वाची शिकवण दिली आहे. व्यंग किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा, द्वेष पसरवण्यासाठी किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नव्हे.
डॉ. चलवादी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्यातून केंद्र सरकारची संवेदनशील आणि तत्पर भूमिका स्पष्ट होते. प्रशासन आणि पोलीस स्तरावरील योग्य मागण्यांवर कार्यवाही सुरू असताना, या विषयाचे केवळ राजकारण करणे देशहिताचे नाही. विरोधी पक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची भूमिका मा.आठवले साहेबांनी मांडली आहे.
उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले असल्याने आंदोलनकर्त्यांनी आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले. न्यायप्रक्रियेला सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा दोषींना कठोर शिक्षा होणे अधिक महत्त्वाचे आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर सभागृहात सविस्तर चर्चा होण्यासाठी सरकारला सहकार्य करावे. विद्यार्थी आंदोलनाचे श्रेय घेऊन राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी भूमिका मा. रामदास आठवले यांनी मांडल्याचे डॉ. हुलगेश चलवादी यांनी स्पष्ट केले.