
no images were found
दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड पुनरावृत्ती
श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच हाही मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून मृतदेहाचे तुकडे फेकत होते.
दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील भयानकता अजून लोकांच्या स्मरणात असतानाच आणखी त्याच पद्धतीचे एक हत्याकांड दिल्लीत उघडकीस आले. अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेहाच्या तुकड्याची दररोज विल्हेवाट लावण्याचा आरोप मृत व्यक्तीच्या पत्नी व मुलावरच ठेवण्यात आला आहे. ही क्रूर घटना पांडवनगर भागात घडली असून या प्रकरणी पोलिसांकडून मृताच्या पत्नी व मुलाला अटक करण्यात आलेली आहे.
मृत व्यक्ती अंजन दास याची आरोपी पत्नीचे नाव पूनम असून त्याच्या मुलाचे नाव दीपक आहे. पूनमने पती अंजन यांना प्रथम झोपेच्या गोळ्या देऊन हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून त्याचे एक एक करून तुकडे करत ते तुकडे नजीकच्या मैदानात तसेच अक्षरधाम परिसर येथे फेकून दिले. शेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक हातात बॅग घेऊन रात्री उशिरा येथून फिरताना दिसतो तसेच दीपकच्या मागे त्याची आई पूनमही यामध्ये दिसून येत आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जयानाचे हे फुटेज असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा गुन्हा उघडकीस आला. ज्या फ्रीजमध्ये मृतदेह ठेवण्यात आला होता, तो फ्रीजही पोलिसांनी जप्त केला आहे. मागील मे महिन्यामध्ये अंजन दास यांची हत्या करण्यात आली होती. अंजन दास हे बाहेरख्याली असल्यामुळे त्यातून पती—पत्नीमध्ये नेहमी वाद होत असे. या वादातूनच बदला घेण्याच्या उद्देशाने पूनमने अंजनची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणामध्ये ही हत्या सुमारे ६ महिन्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उघडकीस आली. या ह्त्त्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपी असलेल्या मृताची पत्नी व मुलाला अटक करण्यात आलेली आहे.