Home Uncategorized विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आकांक्षांचे अभ्यासक्रमात रूपांतर होणे गरजेचे: प्राचार्य अनिल राव

विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आकांक्षांचे अभ्यासक्रमात रूपांतर होणे गरजेचे: प्राचार्य अनिल राव

8 second read
0
0
8

no images were found

   विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, आकांक्षांचे अभ्यासक्रमात रूपांतर होणे गरजेचे: प्राचार्य अनिल राव

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात उमटून त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष शिक्षणात झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, बहुविषयांचे शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप तसेच विविध माध्यमांतून क्रेडिट मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी-२०२०) अंमलबजावणी सर्व स्तरांवर प्रभावीपणे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या ‘एनईपी-२०२०’ टास्क फोर्सचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिविभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी ‘एनईपी-२०२०ची अंमलबजावणी आणि त्यामधील आव्हाने’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना एनईपीच्या विविध पैलूंविषयी त्यांची मते जाणून घेतली. विषय निवडीतील लवचिकता, मल्टिपल एंट्री-एक्झिट, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, सर्वांगीण विकास, कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षण, इंटर्नशिप आणि इंडियन नॉलेज सिस्टिम या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अपेक्षा प्रत्यक्षात आणणे हीच धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीची खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनईपीची अंमलबजावणी करताना विद्यापीठांनी पारंपरिक व कठोर चौकटींपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक लवचिक पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगताना राव म्हणाले, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, ‘कॅफेटेरिया ॲप्रोच’द्वारे विषय निवडीचे स्वातंत्र्य, विविध संस्थांमधून क्रेडिट मिळविण्याची सुविधा, कौशल्य व ऑन-जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप, मातृभाषेतून शिक्षण आणि पूर्वज्ञानाला मान्यता अशा संधी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी अभ्यास मंडळांनी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि बदलत्या जगाच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करावे, तसेच शिक्षक व प्रशासकीय यंत्रणेने मानसिकतेतील पारंपरिक बंधने दूर करून प्रयोगशीलता स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पुणे येथील रेझोनन्स आंत्रप्रिन्युअर अँड एम्प्लॉएबिलिटी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिनारे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, उच्चशिक्षणाचे लोकशाहीकरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी एनईपी-२०२०ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. उच्चशिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण २०३५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांची गळती रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम, बहुविषयांचे शिक्षण, मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित परीक्षा पद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एनईपीच्या अंमलबजावणीतील मोठे आव्हान हे केवळ प्रशासकीय नसून मानसिकता, धोरणाची समज आणि विविध संस्थांमध्ये आवश्यक असलेली सुसूत्रता हे आहे. त्यामुळे

धोरणकर्ते, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यशाळेपुरते मर्यादित न राहता त्यातील विचार प्रत्यक्ष शैक्षणिक व्यवहारात आणण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही डॉ. कामत यांनी केले.

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी परिचय करून दिला. डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

मातृ मायेच्या सावलीला ७५ वर्षे पूर्ण, खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी…