no images were found
एकीकडे ‘राज्य महोत्सव’, तर दुसरीकडे बंदी का ? – कोल्हापूर जिल्हा परिषद येथील प्रशासकीय दुटप्पीपणावर हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या 22 वर्षांपासून अत्यंत शांततेत आणि उत्साहात सुरू असलेला गणेशोत्सव, एका संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. एकीकडे गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करायचे आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 22 वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव अचानक बंद करायचा, हा प्रशासकीय विरोधाभास नेमका कशासाठी? तरी जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेली २२ वर्षे चालू असलेला गणेशोत्सव अचानक बंद करण्याचा निर्णय रद्द करून गणेशोत्सव पूर्ववत सुरू करण्यात यावा, तसेच सदर निर्णयाचा कायदेशीर आधार तपासून संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशा मागगणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनास दिले आहे. हे निवेदन तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांनी स्वीकारले. हेच निवेदन जिल्हा परिषद येथे बांधकाम सभापती सौ. सारिका नांदेकर यांनाही देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. इंद्रजीत पाटील आणि सोनाली पाटील, श्री. प्रवीण यादव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, मराठा तितुका मेळवावाचे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदू जागरणच्या डॉ. अश्विनी माळकर, हिंदु महासभेचे मनोहर सोरप, पूजा शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, अजित सुस्वरे, प्रीतम पवार, हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवानंद पणदे, श्री. विजय पाटील, श्री. दिलीप भिवटे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाणी, नगरपालिका, पोलीस मुख्यालये आणि इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव, शस्रपूजन आणि शिवजयंती यांसारखे उपक्रम अनेक दशकांपासून शांततेत साजरे केले जातात. मग केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेतच हा नियम का लावला जात आहे? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ शासकीय व्यवस्थेने प्रत्येक धार्मिक परंपरेपासून अलिप्त राहणे असा असेल, तर महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे 1997 पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असल्याची अधिकृत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सरकारी कार्यालये व महामंडळांतील कर्मचारी या गणेशोत्सव समितीचा भाग आहेत. मग एका ठिकाणी गणेशोत्सव ‘सांस्कृतिक परंपरा’ म्हणून साजरा केला जातो आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये तोच उत्सव ‘धर्मनिरपेक्षतेच्या’ नावाखाली बंद केला जातो, हा प्रशासकीय दुटप्पीपणा नाही का?
तरी आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1. जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेली २२ वर्षे सुरू असलेला गणेशोत्सव कोणताही वैध व स्पष्ट कायदेशीर प्रतिबंध नसल्यास पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास तात्काळ लेखी परवानगी द्यावी.
2. गणेशोत्सव बंद करण्याचा आदेश कोणत्या कायद्याच्या/नियमाच्या आधारे दिला, त्याची प्रमाणित प्रत सार्वजनिक करावी.
3. जर हा निर्णय अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन, संविधानाच्या कलम 14 आणि 25 चे उल्लंघन करून व कोणत्याही सक्षम शासन आदेशाशिवाय घेतला असल्याचे आढळले, तर संबंधित अधिकार्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
4. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेचा हा बंदीचा निर्णय राज्य शासनाच्या धोरणाशी सुसंगत आहे का, याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे.