no images were found
साखर दरवाढीवर सरकारचे उपाय शेतकरी,साखर उद्योगासाठी हितकारक-हेमंत पाटील:साखरेच्या दरवाढीचे खापर इथेनॉल उत्पादनावर फोडणे अयोग्य
साखरेच्या दरवाढीचे खापर इथेनॉल उत्पादनावर फोडणे योग्य नाही. उलट, अतिरिक्त साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर केल्याने साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून ऊस उत्पादकांना वेळेवर पेमेंट मिळण्यास मदत झाली आहे. २०२५-२६च्या हंगामातील ९७ टक्के ऊस थकबाकी शेतकऱ्यांना अदा झाल्याची स्थिती सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे पाटील म्हणाले.
यंदा ऊस उत्पादनावर रोगराई, अतिवृष्टी आणि पाणी साचल्याचा परिणाम झाल्याने साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीचा निर्णय घेतला आहे. तसेच साखर साठवणुकीवर मर्यादा, साठ्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि ऑक्टोबरपासून लवकर गाळप सुरू करण्याच्या उपाययोजनांमुळे कृत्रिम टंचाईला आळा बसेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
या निर्णयांमुळे ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध होण्यास मदत होईल, तर कारखान्यांना बाजारातील स्थिरता मिळेल. गाळप हंगाम वेळेत सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या उसाला मागणी आणि कारखान्यांच्या रोख प्रवाहात वाढ होईल. सरकारने ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांच्या हिताचा समतोल साधला असून, साखर उद्योगाला दीर्घकालीन स्थैर्य देण्यासाठी हे निर्णय महत्त्वाचे असल्याचे पाटील म्हणाले.