no images were found
खासबाग मैदानाच्या कामांना गती – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड
कोल्हापूर, : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील खासबाग कुस्ती मैदान तसेच संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेरील उर्वरित कामांची महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज संबंधित अधिकारी व ठेकेदारांसमवेत पाहणी केली. मैदानातील स्वच्छतेचे व गवत काढण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खासबाग मैदानामध्ये सतत गवत काढणे, औषध फवारणी, झाडे-झुडपे व चॅनलची स्वच्छता तसेच संपूर्ण परिसर मोटरेबल ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या. ठेकेदाराच्या कामाच्या व्याप्तीत नसलेली कामे महापालिकेमार्फत तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या. नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून ते रंगकर्मी व सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी महापालिका व रंगकर्मी यांच्याशी चर्चा करून परवडणारे दर निश्चित करण्यात आले असून त्यास रंगकर्मींचीही संमती मिळाली आहे. नाट्यगृहाचे संपूर्ण नियंत्रण महापालिकेकडे राहणार असून वास्तूचे वैभव कायमस्वरूपी टिकविण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था, तज्ज्ञ तंत्रज्ञ व नियमित स्वच्छता यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
नाट्यगृहातील लाईट इफेक्ट, साऊंड सिस्टीम तसेच इतर अनुषंगिक यंत्रणांची दररोज चाचणी घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या. उर्वरित सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस निरिक्षक किरण लोंढे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सहाय्यक विद्युत अभियंता नारायण पुजारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.