Home राष्ट्रीय भाजपाच्या वतीने कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

भाजपाच्या वतीने कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

0 second read
0
0
8

no images were found

भाजपाच्या वतीने कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

कोल्हापूर,: भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानांतर्गत शहरात भव्य तिरंगा पदयात्रा आयोजन करण्यात आले. मिरजकर तिकटी येथे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील विविध तालीम संस्था, सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र आले. भारतमातेच्या जयघोषाने आणि राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
पदयात्रेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरजकर तिकटी येथून हातात तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
हातात तिरंगा ध्वज घेतलेले कार्यकर्ते व नागरिक, देशभक्तीपर घोषणा आणि जयघोष यामुळे संपूर्ण मार्गावर राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ही तिरंगा यात्रा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतमाता, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार विशेष आकर्षण ठरले.
यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अखंड राष्ट्रभावनेचा अभिमान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत आहे. कोल्हापूरकरांनी या तिरंगा रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा देशभक्तीची भावना किती प्रबळ आहे, याचे द्योतक आहे.”

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, “देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकावा आणि देशाच्या स्वातंत्र्याची, संविधानाची व राष्ट्राच्या गौरवाची जाणीव प्रत्येकाच्या मनात दृढ व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.”

महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, “कोल्हापूर शहराला राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेची मोठी परंपरा आहे. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सर्व समाजघटक, तालीम संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन राष्ट्रध्वजाला अभिवादन करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आपण करूया.”

यावेळी भाजपाचे माजी प्रदेश सचिव महेश जाधव तसेच माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांनी
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवावा, असे आवाहन करीत तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असून राष्ट्रहिताची भावना अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

भाजपाच्या या तिरंगा पदयात्रेला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा व महिला कार्यकर्त्यांसह शहरातील विविध तालीम संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पदयात्रेदरम्यान नागरिकांनीही तिरंग्याला अभिवादन करत उत्साहाने सहभाग घेतला.
*‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’**च्या घोषणांनी कोल्हापूर शहरात राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महापौर रूपाराणी निकम, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल चिकोडे, गटनेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती किरण शिराळे, नगरसेवक प्रा.जयंत पाटील सर, सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, विश्वजीत पवार, अनिल कामत महेश यादव यांच्यासह भाजपा नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय
Comments are closed.

Check Also

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर

प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकर कोल्हापूर,: स्व…