no images were found
राजारामपुरीतील १२ गल्ल्यांमध्ये महापालिकेची विशेष महसूल व परवाना तपासणी मोहीम
२९५ विनापरवाना आस्थापनांना नोटिसा; मालमत्ता व परवाना दप्तर अद्ययावत करण्यावर भर
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करणे, अनधिकृत व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे तसेच मालमत्ता व परवाना विभागाचे दप्तर अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राजारामपुरी परिसरातील १२ गल्ल्यांमध्ये आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी प्रत्येक गल्लीसाठी स्वतंत्र पथक याप्रमाणे एकूण १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांमार्फत २९५ विनापरवाना आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या.
या मोहिमेअंतर्गत आज सुमारे ३० टक्के भागामध्ये नोटिसा बजावण्यात आल्या असून, उर्वरित आस्थापनांनाही नोटिसा बजावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकामध्ये एक कर सहाय्यक (Tax Assistant) तसेच उपद्रव शोध पथकातील (NDS) एका माजी सैनिक अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला होता. नियुक्त पथकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील व्यावसायिक आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिक परवाने तसेच भाडेकरू व कुळ नोंदींची तपासणी केली. संबंधितांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष वापर, कुळ व इतर संबंधित बाबींची छाननी करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत विनापरवाना अथवा अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्यावसायिक आस्थापनांचा शोध घेऊन त्यांची महापालिका दप्तरी नोंद करण्यात येत आहे. संबंधित व्यावसायिकांनी आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असून, त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यावरही भर देण्यात येत आहे. तसेच निवासी गाळे अथवा इमारतींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्यास त्याची नोंद घेऊन नियमानुसार व्यावसायिक मालमत्ता कर आकारणी करण्यात येणार आहे. संबंधित मालमत्तेची कर थकबाकी असल्यास तिच्या वसुलीसाठीही पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता, कर व परवाना विभागातील नोंदी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.
ही विशेष मोहीम महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार व उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा. आयुक्त डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना, घरफाळा व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत राबविली.