no images were found
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला १० दिवसांची कोठडी
नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला १० दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयानं गुरुवारी दिले आहेत .
मुसेवालाच्या हत्येमागं परदेशी कनेक्शन असल्याचं एजन्सीनं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळंच लॉरेन्सला चौकशीसाठी ताब्यात घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या खून प्रकरणात आता अनेक गुपितं उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधील भटिंडा तुरुंगातून एनआयएनं बुधवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिश्नोईचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली. एनआयएला या प्रकरणी अनेक महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात तपास यंत्रणेनं या वर्षी मार्चमध्ये एका मोबाईल क्रमांकाबाबत माहिती मिळवली. हा क्रमांक कुख्यात दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांचा होता, जो दिल्लीच्या तिहार तुरुंगात वापरला जात होता. अशी माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एनआयएनं कोर्टात १२ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.