no images were found
हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या
‘अगं आई अहो आई’ या Zee5 मराठीच्या ओरिजिनल सीरिजमध्ये कौटुंबिक नात्यांची सुंदर वीण पाहायला मिळणार
Zee5 मराठीने ‘अगं आई अहो आई’ या आपल्या आगामी ओरिजिनल सीरिजचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये कुटुंब, नाती आणि मायेचा सुंदर प्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे. वरुण नार्वेकर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, कल्याणी पंडित यांनी लेखन केले आहे. जिओ स्टुडिओज, बहावा एंटरटेन्मेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. मुलगी, तिची आई आणि सासू यांच्यातील हळुवार आणि क्वचितच पडद्यावर पाहायला मिळणाऱ्या नात्याचा वेगळा पैलू या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेमाने आणि आपुलकीने कुटुंब अधिक घट्ट जोडले जाते, हाच संदेश ही सीरिज देते. ‘अगं आई अहो आई’चा प्रीमियर 24 जुलै 2026 रोजी केवळ Zee5 मराठीवर होणार आहे.
‘अगं आई अहो आई’ ही नाती, स्वीकार आणि माणसांच्या परस्परांशी असलेल्या बंधांची गोष्ट आहे. पुणे आणि कोल्हापूर या दोन वेगळ्या वातावरणांच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. लग्नानंतर एका नवविवाहित तरुणीचा नव्या कुटुंबात स्वतःचे स्थान शोधण्याचा प्रवास या सीरिजमध्ये उलगडून दाखवण्यात आला आहे. या प्रवासात बदलणारी नाती, भावनिक टप्पे आणि नव्या अनुभवांना ती सामोरी जाते. लग्नानंतर प्रत्येक मुलीसमोर एक न बोलला जाणारा प्रश्न उभा राहतो. जन्मदात्या आईचे नाते जपत नव्या आईला कसे स्वीकारायचे? ‘अगं आई अहो आई’ सीरीजमध्ये या प्रश्नाकडे एका वेगळ्या नजरेतून पाहण्यात आले आहे. स्पर्धा, अपेक्षा किंवा नात्यांमधील ओढाताण न दाखवता, एका स्त्रीला या दोघींमधून कोणाचीही निवड करावी लागत नाही, हे ही सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. तिची आई आणि सासू यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यामुळे एक आई गमावल्याची भावना न राहता, आणखी एक आई मिळाल्याचा आनंद तिच्या वाट्याला येतो. सहज वाटणारी पात्रे आणि मनाला स्पर्श करणाऱ्या प्रसंगांमधून सहानुभूती, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे केवळ घर नव्हे, तर खऱ्या अर्थाने कुटुंब घडते, हे ही सीरिज अधोरेखित करते.
या सीरिजमध्ये नायिकेचा भावनिक प्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे. पुण्यातील आपले परिचित आयुष्य मागे सोडून ती कोल्हापुरात नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, नवी माणसे आणि नव्या अपेक्षांशी जुळवून घेत असताना ती आपल्या नव्या कुटुंबाशी हळूहळू अर्थपूर्ण नाते जोडते. सहानुभूती आणि परस्पर आदर यांच्या आधारावरच स्वीकार मिळतो, याची तिला जाणीव होत जाते.सून आणि सासू यांच्यात हळूहळू फुलत जाणारे नाते या कथेच्या केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला संकोच आणि अनिश्चिततेने सुरू झालेले हे नाते पुढे मैत्री, आधार आणि समजूतदारपणावर उभे राहते. त्यामुळे सासू-सुनेच्या नात्याबद्दलच्या पारंपरिक समजुतींना ही सीरिज छेद देते. नायिकेची आई आणि सासू यांच्यातील जिव्हाळ्याची मैत्रीदेखील या सीरिजमध्ये अधोरेखित करून दाखवली आहे. त्यामुळे आधुनिक कौटुंबिक नातेसंबंधांचा एक सकारात्मक पैलू समोर येतो.
झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर आणि Zee5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “Zee5 मराठीमध्ये आम्हाला नेहमीच बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथा सांगण्यावर विश्वास आहे. ‘हे काय नवीन?’ या सीरिजनंतर वरुण नार्वेकर यांच्यासोबत पुन्हा काम करताना आम्हाला आनंद होत आहे. आजच्या मराठी प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखणारे ते संवेदनशील दिग्दर्शक आहेत. ‘अगं आई अहो आई’ ही केवळ एक कौटुंबिक कथा नाही. पूर्वग्रह आणि ठरावीक समजुतींपलीकडे फुलणाऱ्या नात्यांचा हा उत्सव आहे. सहानुभूती, विश्वास आणि परस्पर आदर यांच्या आधारावर सासू-सुनेच्या नात्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणारी ही हळवी कथा आहे. भावना, आपुलकी आणि सहजतेने समृद्ध असलेली ही सीरिज प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा आम्हाला विश्वास आहे. ही कथा Zee5 मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.”
दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले, “अनेक वर्षांपासून सासू-सुनेचे नाते पडद्यावर प्रामुख्याने संघर्षाच्या नजरेतून दाखवले गेले आहे. ‘अगं आई अहो आई’मुळे मला एक वेगळी कथा सांगण्याची संधी मिळाली, हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट होती. समजूतदारपणा, सहवास आणि भावनिक जडणघडण यांवर आधारलेली ही कथा आहे. कुटुंबातील नाती ही केवळ पारंपरिक भूमिकांनी ठरत नाहीत, तर स्वीकार, आपुलकी आणि जपलेल्या नात्यांमधून ती दररोज घडत जातात, हा विचार या सीरिजमधून मांडण्यात आला आहे.”
रेणुका शहाणे म्हणाल्या, “ ‘अगं आई अहो आई’मधील सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे पडद्यावर क्वचितच पाहायला मिळणारे आई आणि सासू यांच्यातील मैत्रीचे नाते. प्रत्येक आईला आपल्या मुलीने आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करताना तिच्यावर प्रेम करणारे, तिला समजून घेणारे आणि तिची काळजी घेणारे माणसे मिळावीत, असे वाटत असते. आपल्या मुलीने एक कुटुंब गमावले नाही, तर तिला आणखी एक कुटुंब आणि कदाचित आणखी एक आई मिळाली आहे, ही भावना ही कथा अतिशय सुंदरपणे मांडते. या दोन महिलांमधील आपुलकी, विश्वास आणि परस्पर आदर यांमुळे ही सीरिज मनाला उब देणारी ठरते. प्रेक्षकांनाही ही कथा आपलीशी वाटेल, असा मला विश्वास आहे.”
निर्मिती सावंत म्हणाल्या, “ ‘अगं आई अहो आई’बद्दल मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपासून रूढ झालेल्या सासू-सुनेच्या नात्याविषयीच्या ठरावीक चौकटीला ही सीरिज छेद देते. संघर्ष, वर्चस्व किंवा अहंकार यांवर भर न देता, सासू आणि सून यांच्यात खऱ्या अर्थाने प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण होऊ शकते, ही शक्यता ती मांडते. लग्न म्हणजे एका मुलीने एक कुटुंब गमावून दुसरे मिळवणे नव्हे, तर तिला आणखी एक आई मिळणे, हा सुंदर विचार ही कथा मांडते. परस्पर समजूतदारपणा, आदर आणि जिव्हाळा हा या नात्यांचा पाया आहे. त्यामुळे ही कथा वेगळी, ताजी आणि मनाला स्पर्श करणारी ठरते. या प्रवासात प्रत्येक क्षणी जाणवणारी सकारात्मकता आणि आपुलकी प्रेक्षकांच्या मनालाही नक्कीच भिडेल.”
हृता दुर्गुळे म्हणाली, “या कथेचा प्रामाणिकपणा आणि आजच्या काळाशी असलेली तिची जवळीक मला सुरुवातीपासूनच भावली. लग्नानंतर अनेक तरुणींच्या मनात असणाऱ्या आशा, भीती आणि अनिश्चितता घेऊन मी साकारत असलेली व्यक्तिरेखा नव्या कुटुंबात प्रवेश करते. मात्र, ही कथा नेहमीच्या चौकटीत अडकत नाही. उलट, नव्या कुटुंबात तिला मिळणारा आधार, मैत्री आणि आपलेपणाचा शोध हा तिच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. सासूसोबत ती ज्या सुंदर नात्याची वीण विणते आणि तिच्या भावविश्वात होत जाणारा बदल प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा मला विश्वास आहे.”
आपुलकी, विनोद आणि प्रत्येक घरात घडणाऱ्या सहज, हळव्या प्रसंगांनी भरलेल्या ‘अगं आई अहो आई’ या सीरिजच्या माध्यमातून कुटुंब, स्वीकार आणि माणसांना एकमेकांशी जोडणाऱ्या नात्यांचा सुंदर उत्सव साजरा करण्यात आला आहे.