Home Uncategorized राजर्षी छत्रपती शाहू महाराज – लोकोत्तर राजा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज – लोकोत्तर राजा

3 second read
0
0
12

no images were found

 प्रासंगिक :-

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज – लोकोत्तर राजा

आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन !
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर ते खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे आणि सर्व जाती धर्माचे राजे होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांची स्वतःची पण तशीच भावना होती. ती भावना त्यांनी जैन, मुस्लिम, लिंगायत, ब्राह्मण समाज आदी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची निर्मिती करून आपण केवळ मराठा समाजाचे राजे नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.अशा या लोकोत्तर न्यायप्रिय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला .
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्याने तत्कालीन उपेक्षित, वंचित आणि शोषित समाजाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणले. केवळ त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर न थांबता हिंदू – मुस्लीम ही सामाजिक वीणही घट्ट केली. शाहू महाराजांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याची विण घट्ट करताना अनेक मुस्लिम धर्मियांच्या कलेला राजाश्रय दिला. त्याचबरोबर अनेक विविध सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार केला. आपल्या द्रष्टेपणातून त्यांनी कोल्हापूर संस्थानला जगाच्या पातळीवर पोहचविले.18 व्या शतकाच्या सुमारास युरोपात झालेल्या चळवळीचा अभ्यास करून त्यांनी कामगारांना संघटित व्हा ! त्याचबरोबर ऐक्याचा, स्वावलंबनाचा मार्ग अवलंबताना वेळप्रसंगी भांडवलदारांशी संघर्षाचे धोरण ठेवा असा मूलमंत्र दिला. केवळ कामगार वर्गच नाही तर शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडात कृषी, उद्योग, सहकार, शिक्षा, क्रीडा, सांस्कृतिक, मल्लविद्या आदी बाबींना प्रोत्साहन दिले. या बाबींना केवळ प्रोत्साहन देवून शाहू महाराज थांबले नाहीत तर त्यांनी सार्वत्रिक पाटबंधारे धोरणाची अंमलबजावणी करत त्याकाळात राधानगरी धरणाची निर्मिती केली. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले. या धरणाच्या माध्यमातूनच कोल्हापूरच्या हरितक्रांतीला प्रारंभ झाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. केवळ या धरण निर्मितीवर अवलंबून न राहता त्यांनी कृषी क्षेत्रातही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या मालाला यथायोग्य बाजारपेठ मिळावी या उदात्त विचाराने शाहूपुरी, जयसिंगपूर या ठिकाणी बाजारपेठांची निर्मिती केली. तसेच उद्योगधंद्याच्या क्षेत्रातही अनेक अभिनव प्रयोग राबविले. याची साक्ष देणारी इमारत म्हणजे, छत्रपती शाहू मिलची उभारणी. या मिलची सन 1906 साली कोल्हापुरात उभारणी करण्यात आली. ही मिल उभारण्या पाठीमागे छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा होती. शाहू महाराजांनी कृषी, उद्योग या क्षेत्रांबरोबरच सहकार क्षेत्रालाही आपलेसे करत त्याची मुहर्तमेढ रोवली. केवळ सहकार क्षेत्राची उभारणी न करता 1912 साली सहकार तत्वास कायद्याचे स्वरूप दिले आणि “सहकारी संस्था विषयक कायदा” जारी केला. यातूनच कोल्हापूरच्या सहकारी संस्था नावारूपास आल्या. राजांच्या द्रष्टेपणामुळेच तत्कालीन संस्थानातील सहकारी चळवळीची संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक वाढ दिवसेंदिवस होत राहिली. सहकार चळवळीत आपल्या निदर्शनाला येणारी ही वाढ छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नपूर्वक नियोजनामुळेच झाली असल्याची बाब आपल्या निदर्शनास येते. शाहू महाराजांनी केवळ राज्यकारभाचं केला नाही तर आपल्या अल्पशा कारकिर्दीत अनेक कला, विद्या, गुण ग्राहकतेला मुक्तहस्ते राजाश्रय दिला .
आज महाराष्ट्रात मल्लविद्या जिवंत राहण्यास तत्कालीन कालखंडात शाहू महाराजांनी कुस्तीच्या कलेला दिलेला राजाश्रय आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. केवळ कुस्ती या खेळावर प्रेम न करता महाराजांनी संगीत, नाट्य कलेला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला. अनेक कलावंत तसेच नाट्य कंपन्यांच्या उभारणीसाठी सढळ हस्ते मदत केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व सर्वत्र ठळकपणे दिसायचे. त्यांचे महाराजपण जाणवायचे, शाहू महाराजांसारखा राजा सर्वांना आपल्याच कुटुंबातील एक सदस्य वाटायचे. सामान्य माणसांबद्दल त्यांना अंतकरणापासून प्रेम असायचे. त्यांची राहणी सामान्य माणसाप्रमाणेच होती. त्यांना वैभवाचे प्रदर्शन करणे आवडत नसायचे म्हणूनच ते गावकुसाबाहेरील समाजात सहजासहजी मिसळून जात असत. अशा या लोकोत्तर राजाला 6 मे 1922 साली मरण आले. सन 1874 ते 1922 या केवळ 48 वर्षाच्या कालखंडात या न्यायी राजाने आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या कार्याचा अमिट असा ठसा उमटविला. केवळ एका लेखाद्वारे या राजाच्या कर्तृत्वाचा इतिहास आपल्या लक्षात येणार नाही. या राजाने आखून दिलेल्या मार्गावरूनच प्रत्येकाने वाटचाल करण्याबाबत विचार करून त्या दृष्टीने केलेली कृतीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल.

– फारुख बागवान,- माहिती अधिकारी, 9881400405,
– जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या; डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात …