no images were found
आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारताच्या व्यापारात ५.४ टक्क्यांची दमदार वाढ-हेमंत पाटील
पुणे,: जागतिक पातळीवर आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेचे वातावरण असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारताच्या व्यापार क्षेत्राने पुन्हा एकदा आपली मजबुती सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२४) केले. नीती आयोगाने वित्त वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च २०२६) ‘ट्रेड वॉच क्वार्टरली’ या अहवालाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार, संपूर्ण वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा एकूण वस्तू आणि सेवा व्यापार वार्षिक ५.४ टक्क्यांनी वाढून १.८४ ट्रिलियन अमेरिकी डॉलरवर पोहोचला असल्याचे नमूद करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.
सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताने वर्ष २०२५ मध्ये जगातील आठवा सर्वात मोठा सेवा निर्यातदार देश म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. गेल्या दशकभरात (२०१५-२०२५) भारताच्या सेवा निर्यातीचा चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (CAGR) १०.३ टक्के राहिला आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात सेवा निर्यातीत ९ टक्क्यांची उत्कृष्ट वाढ झाली असून, यामुळे सेवा क्षेत्रातील भारताचा नफा (Surplus) भक्कम राहिला असल्याचे पाटील म्हणाले.
या अहवालात भारताच्या औषध (फार्मास्युटिकल) क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. जेनेरिक औषधे, लसी आणि आवश्यक औषधोपचारांचा जगातील अग्रगण्य पुरवठादार म्हणून भारताने जागतिक आरोग्य सुरक्षेत मोलाचे योगदान दिले आहे. २०२५ मध्ये जागतिक पातळीवर औषधे आणि ‘एपीआय’ची (API) मागणी १.३ ट्रिलियन डॉलर असताना भारताने तब्बल ३५.८ बिलियन अमेरिकी डॉलर मूल्याची औषध उत्पादने निर्यात केली आहेत, असे नीती आयोगाच्या अहवालात नमूद असल्याचे पाटील म्हणाले.
सरकारच्या क्लस्टर-आधारित विकास आणि पूरक औद्योगिक धोरणांमुळे महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात ही राज्ये देशाच्या फार्मा क्षेत्राचे मुख्य स्तंभ बनली आहेत. भविष्यात मूल्यवर्धन आणि नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन या क्षेत्रातील भारताचा वाटा आणखी वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. हा अहवाल भारताच्या प्रगतीची आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या प्रभावाची साक्ष देतो, असे पाटील म्हणाले.