no images were found
शहरातील नालेसफाई अंतिम टप्प्यात : 11 हजार 600 टन गाळाचा उठाव
कोल्हापूर, : शहरातील पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या नालेसफाई मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 11 हजार 600 टन गाळाचा उठाव करण्यात आला असून शहरातील नाले व चॅनेल सफाईचे काम अंतिम टप्प्यात आहे.
महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने नालेसफाई केली जाते. यंदाही आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नालेसफाईची मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्यावतीने यावर्षी प्रथमच सी-30 व सी-70 या छोट्या पोकलँण्डद्वारे नालेसफाई करण्यात येत आहे. हि सफाई ज्या ठिकाणी मनुष्याद्वारे अरुंद नाल्यामध्ये करणे अडचणीचे आहे. अशा ठिकाणी याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच अधिक प्रभावीपणे नालेसफाई राबवली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत 3 पोकलेन मशिनद्वारे जयंती नाला, श्याम सोसायटी नाला व गोमती नाल्यातील काढलेल्या अंदाजे 10 हजार टन गाळापैकी 7 हजार 500 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. तसेच 50 फूट बूम पोकलेनच्या सहाय्याने जयंती पंपिंग स्टेशन, श्याम सोसायटी व ॲस्टर आधार हॉस्पिटल परिसरातील नाल्यांमधून काढलेल्या अंदाजे 6 हजार टन गाळापैकी 4 हजार 100 टन गाळाचा उठाव करण्यात आला आहे. याशिवाय जेसीबीच्या सहाय्याने शहरातील 206 ओढे, चॅनेल व लहान नाल्यांपैकी 196 नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 50 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 476 ओढे, नाले व चॅनेलपैकी 459 ठिकाणांची सफाई पुर्ण करण्यात आली आहे. महापालिकेने शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांची नियमित साफसफाई सुरू ठेवली असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी नाले व नाल्यांच्या परिसरात कचरा, प्लास्टिक तसेच इतर टाकाऊ वस्तू टाकू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहर स्वच्छ व पूरमुक्त ठेवण्यास मदत होणार आहे.