no images were found
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा जपणार : आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांचा निर्धार
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरात जल्लोष; जिलेबी वाटप करून शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव
कोल्हापूर(प्रतिनिधी ): शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या स्वाभिमानी बाण्यासाठी १९ जून १९६६ साली मुंबई मधून शिवसेनेच्या झंजावात सुरु झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी माणसाला न्याय मिळू लागला. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने शिवसैनिकांनी सामाजिक कार्याला दिलेले प्राधान्य आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी संपूर्ण राज्यासह देशभरात शिवसेना जनमानसांच्या मनात रुजली. शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. त्याचे फलित म्हणून शिवसेना अधिक मजबूत होताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा जपून, लोकहिताच्या कामांना प्राधान्य देणे हेच कर्तव्य समजून पुढील काळात कार्यरत राहू, असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करत आणि पक्षाच्या स्थापनेपासूनच्या ६० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आनंद व्यक्त करत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला असून ढोल-ताशांच्या तालावर शिवसैनिकांनी उत्स्फूर्त नृत्य करत वर्धापन दिनाचा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत जिलेबी वाटप करून आनंद व्यक्त केला.
शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासाचा अभिमान व्यक्त करत आगामी काळातही जनसेवा, विकास आणि हिंदुत्वाच्या विचारांशी बांधिलकी कायम ठेवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वर्धापन दिनाचा हा सोहळा कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
यावेळी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगिता सावंत, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, शहरप्रमुख रणजित जाधव, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, सुनील जाधव, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, राज जाधव, राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, अनिल पाटील, दुर्गेश लिंग्रस, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, गौरी माळदकर, पूजा कामते, सुनिता भोपळे, सना अत्तार आदी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.