no images were found
सुट्टीच्या दिवशीही दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे कार्यालय सुरू राहणार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवार, दि. १३ जून २०२६ व रविवार, दि. १४ जून २०२६ या शासकीय सुट्टीच्या दिवशीही केंद्राचे मुख्य कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती प्रभारी संचालक डॉ. कृष्णा बी. पाटील यांनी दिली.
केंद्रामार्फत बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. हे दूरशिक्षण (Distance Mode) अभ्यासक्रम तसेच एम.बी.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. (गणित) हे ऑनलाईन (Online Mode) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बहुसंख्य विद्यार्थी हे नोकरी, व्यवसाय किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण घेणारे असल्याने त्यांना आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी कार्यालयात येणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश, मार्गदर्शन, अभ्यासक्रमांची माहिती, पात्रता तपासणी तसेच इतर प्रशासकीय बाबींसाठी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवेश प्रक्रियेची मुदत संपेपर्यंत आवश्यकतेनुसार अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक, अभ्यागत तसेच अभ्यासकेंद्र समन्वयकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यालयाशी अथवा जवळच्या अधिकृत अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा.