
no images were found
श्रद्धा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार?
नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वकिलाने हायकोर्टात केली आहे. या घटनेला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या प्रकरणाचा खोलपर्यंत तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे पुरेसे स्त्रोत नाहीत. अशा वेळी हे प्रकरण तात्काळ दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवले पाहिजे, असे या वकिलांनी याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान, ही याचिका हायकोर्टानं दाखल करून घेतली आहे.
याचिकाकर्त्या वकिलाने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणातील संवेदनशील माहिती मीडियामध्ये देत आहेत, याशिवाय कोर्टाच्या सुनावणीची सविस्तर माहितीही सार्वजनिक केली जात आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या कृतीमुळं पुराव्यांसह साक्षीदारही प्रभावित होऊ शकतात, अशी शंकाही व्यक्त केली आहे.
ही घटना गंभीर आहे. तरीही दिल्ली पोलिसांनी या घटनेशी संबंधित ठिकाणे सील केलेली नाहीत. या ठिकाणांवर मीडियाचे प्रतिनिधी आणि सामान्य लोकांचा वावरही वाढला आहे. हे खूप बेजबाबदारपणाचे आहे, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या घटनेतील महत्वाची माहिती सार्वजनिक केली जात आहे. याशिवाय फॉरेन्सिक पुरावे देखील सुरक्षित ठेवले जात नाहीत. अशा प्रकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळे या प्रकरणात योग्य निकाल लागत नाही, असं सांगतानाच याचिकाकर्त्यानं एनसीआरबीच्या एका रिपोर्टचा उल्लेख केला आहे.गंभीर प्रकारच्या घटनांमध्ये चुकीचा तपास किंवा अशा प्रकारे पुराव्यांशी छेडछाड झाल्यानं ही परिस्थिती उद्भवते. २०२१ मध्ये केवळ ४४ टक्के प्रकरणांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे, असंही याचिकेत नमूद केलं आहे.