no images were found
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन आणि गुजरात सरकारची भागीदारी; कच्छमधील 11 आयटीआयमध्ये बदल घडवणार
- या उपक्रमाचा उद्देश स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, बाहेरगावी होणारे स्थलांतर कमी करणे आणि नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी उद्योगसज्ज मनुष्यबळ तयार करणे हा आहे.
- या सहकार्यांतर्गत अभ्यासक्रमात सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि ऑन-द-जॉब प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे.
- ‘कर्म उत्सव’ या कौशल्याधारित करिअर आणि रोजगार विकासावर आधारित कार्यक्रमाला 650 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
भुज, : उद्योग आणि व्यवसायांच्या गरजांनुसार मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास व्यवस्था उभारण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अदाणी समूहाच्या ‘अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन’ (एएसई) या संस्थेने आज गुजरात सरकारसोबत दोन सामंजस्य करार (एमओयू) केले. या करारांतर्गत कच्छमधील 11 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार आहे.
कच्छ हा भाग सध्या नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
एएसईच्या ‘कर्म उत्सव’ कार्यक्रमादरम्यान भुज येथील GAIMS ऑडिटोरियममध्ये अधिकृतपणे या सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. कौशल्यपूर्ण कामाला सन्मान मिळावा आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या करिअरची निवड करावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला 650 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार विकासाचे वाढते महत्त्व स्पष्ट झाले.
या सहकार्यांतर्गत अभ्यासक्रमात सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, शिक्षकांचे कौशल्यविकास प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, ऑन-द-जॉब प्रशिक्षण आणि रोजगारासाठी मदत यावर विशेष भर दिला जाणार आहे त्यामुळे तांत्रिक शिक्षण उद्योगांच्या गरजांनुसार अधिक उपयुक्त आणि रोजगाराभिमुख होईल.
या कार्यक्रमाला गुजरातचे कामगार, कौशल्य विकास व रोजगार तसेच ग्रामीण विकास मंत्री माननीय श्री कुंवरजीभाई बावलिया, कामगार, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे माननीय राज्यमंत्री श्री कांतीलाल अमृतिया, कच्छ जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि गुजरात सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच अदाणी समूहाचे वरिष्ठ अधिकारी, कच्छमधील सर्व 11 सरकारी आयटीआयचे प्राध्यापक आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान एएसई कडून विद्यार्थ्यांना ‘स्किल2एम्प्लॉय’ निमंत्रण पत्रे देण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन गौरविण्यात आले. तसेच एएसईच्या ‘ट्रेन-द-ट्रेनर’ (TTT) कार्यक्रमांतर्गत 30 प्रशिक्षकांना ‘सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन’ देण्यात आले. अदाणी समूहात सध्या कार्यरत असलेल्या आयटीआय पदवीधरांनीही तांत्रिक शिक्षणापासून व्यावसायिक करिअरपर्यंतचा आपला प्रवास विद्यार्थ्यांसोबत शेअर केला.
सभेला संबोधित करताना श्री बावलिया यांनी स्वावलंबी मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण देणे आणि ‘स्किल इंडिया’ मिशनअंतर्गत प्रत्येक तरुणाला आत्मनिर्भर बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. कौशल्यपूर्ण युवक हे देशाच्या विकासाचा मजबूत पाया आहेत.”
श्री अमृतिया यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या संधींचा लाभ घेऊन चांगले करिअर घडवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कौशल्यपूर्ण युवक ही आपल्या देशाची खरी ताकद आहे. ते भारताच्या आर्थिक विकासात, राष्ट्रीय प्रगतीत आणि राष्ट्रनिर्माणात मोठे योगदान देऊ शकतात.”
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन (एएसई) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रॉबिन भौमिक यांनी सांगितले की, एएसईच्या दीर्घकालीन कौशल्य विकासाच्या दृष्टीने कच्छ हा महत्त्वाचा भाग आहे. ते म्हणाले, “कच्छ ही आमची कर्मभूमी आहे आणि येथील विकासासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. गुजरात सरकार आणि येथील आयटीआय संस्थांसोबतच्या भागीदारीतून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये काम करू शकणारे, उद्योगांसाठी तयार आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे या भागाच्या दीर्घकालीन विकासाला मदत होईल.”
एएसई आपल्या ‘स्किल2एम्प्लॉय’ उपक्रमाद्वारे वर्गातील शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही देत आहे. सिम्युलेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE), ट्रेन-द-ट्रेनर (TTT) कार्यक्रम आणि जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांच्या मदतीने पहिल्याच दिवसापासून प्रभावीपणे काम करू शकणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश कौशल्यपूर्ण युवकांचे बाहेर स्थलांतर कमी करणे आणि कच्छमधील कुशल मनुष्यबळ अधिक मजबूत करणे हा आहे. यामुळे स्थानिक युवकांच्या कौशल्याच्या जोरावर कच्छचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल. आयटीआयमध्ये बदल घडवण्यासाठी एएसई ने तयार केलेला 10 मुद्द्यांचा आराखडा आता देशातील इतर राज्यांमध्येही “गुजरात मॉडेल” म्हणून ओळखला जात आहे.