Home Uncategorized जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

3 second read
0
0
11

no images were found

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

कोल्हापूर,  : कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राधानगरी-भुदरगड-
आजरा विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या या बैठकीत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी डॉ. शेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होवून नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असून आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे श्री. पिंपळे यांनी नमूद केले.

बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आजरा पंचायत समिती सभापती सर्व, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, 108 रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आपला दवाखाना तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती गावा-गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करावे.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच इतर आरोग्य विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विनाअडथळा उपचाराचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून नागरिकांच्या तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध आरोग्यविषयक समस्या, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेला बळकट करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेला बळकट करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट य…