no images were found
जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत नशामुक्तीसाठी ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका घेणार ठराव
- नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत पोलिसांकडून 124 गुन्हे दाखल
- गोपनीय माहिती देण्यासाठी 9822766100 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
- #नशामुक्तकोल्हापूर हा असेल अधिकृत सोशल मीडिया हॅशटॅग
कोल्हापूर, : जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत पोलिस विभागाने आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करून सुमारे 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, महापालिका, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेत प्रत्येक गाव आणि प्रत्येक प्रभाग (वार्ड) नशामुक्त करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी संबंधित ठराव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आयटीआय परिसरातील 100 मीटरच्या हद्दीचे सीमांकन करून तेथील पानटपऱ्या हटविणे, शाळांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती करणे, प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांसाठी नशामुक्तीविषयक विशेष सत्रांचे आयोजन करणे तसेच सर्व विभागांनी आपल्या स्तरावरील जनजागृती उपक्रमांचा आढावा बैठकीत सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 15 जुलैअखेर जिल्ह्यात 124 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 82 गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 213 किलो गांजा, 40 किलो अफूची झाडे आणि 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण 84 लाख 12 हजार 101 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गोपनीय माहितीसाठी 9822766100 क्रमांक; सोशल मीडियावर #नशामुक्तकोल्हापूर हॅशटॅग
अंमली पदार्थांचे सेवन, विक्री अथवा साठवणुकीबाबत नागरिकांना गोपनीय माहिती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने 9822766100 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. नशाविषयक कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास नागरिकांनी या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानाची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना #नशामुक्तकोल्हापूर हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.